Uday Samant | मिरजेत गणेशोत्सवात डीजे वाजणारच : उद्योगमंत्री उदय सामंत

मनपा निवडणुकीत शिवसेनेची ताकद दाखवा
Uday Samant |
मिरज : येथील कार्यक्रमात उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मार्गदर्शन केले.Pudhari Photo
Published on
Updated on

मिरज : यंदाच्या गणेशोत्सवामध्ये प्रशासन जर जाणीवपूर्वक डीजेसंदर्भात दबाव आणत असेल, तर मी तुमच्याबरोबर आहे. यंदा गणेशोत्सव दणक्यातच झाला पाहिजे. प्रशासनाने कार्यकर्त्यांवर दबाव आणू नये, अन्यथा मुख्यमंत्र्यांशी मी बोलतो, असा इशारा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी मिरजेत दिला. येथील महाराणा प्रताप चौकात आयोजित कार्यक्रमात मंत्री उदय सामंत बोलत होते.

मंत्री सामंत म्हणाले, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील ही कार्यकर्त्यांची शिवसेना आहे. शिवसैनिक म्हणून नियमितपणे जनतेची कामे करा. तरच आपण बाळासाहेब ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचे खरे शिवसैनिक म्हणून दिसू. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था व महानगरपालिका निवडणुकीत आपली दखल घेण्याइतके नगरसेवक निवडून आले पाहिजेत, यासाठी आतापासूनच पूर्ण तयारीने कामाला लागा. या महापालिका निवडणुका महायुती म्हणून आपण एकत्र लढणार आहोत. पूर्वी मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे व आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील राज्याला पुढे नेण्याचे काम करीत आहेत. तशीच प्रगती इथल्या महानगरपालिकेची महायुतीच्या माध्यमातून करूया. सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेमध्ये शिवसेनेचे नगरसेवक होते.

पण यापुढे होते नाही, तर शिवसेनेचे नगरसेवक या महापालिकेत आहेत, असे सांगण्याची वेळ आणा. हेच आता दाखवून द्या. या सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेचा विकास करण्यासाठी शिवसेनादेखील या महानगरपालिकेच्या सत्तेत असली पाहिजे. आमचे नेते एकनाथ शिंदे यांनी या महानगरपालिकेला निधी दिला होता. आपल्याला विश्वासात घेतल्याशिवाय कोणालाही महापौर करता आला नाही पाहिजे, असे काम करा. मराठी भाषेसाठी आणि मराठी माणसांसाठीदेखील या महानगरपालिकेमध्ये काहीतरी करावे.

सामंत यांचे भाषण सुरू असतानाच व्यासपीठावरील एका कार्यकर्त्याने गणेशोत्सवाच्या काळामध्ये प्रशासन दबाव आणत असल्याचे सांगितले. याबाबत मंत्री सामंत म्हणाले, गणेशोत्सवात डीजेसंदर्भात प्रशासन दबाव आणत असेल, तर मी स्वतः तुमच्याबरोबर आहे. प्रशासनाच्या वागण्याने उत्सव बिघडू नये. प्रशासनाने जाणीवपूर्वक दबाव आणू नये. प्रशासन दबाव आणत असेल, तर मी स्वतः मुख्यमंत्र्यांशी बोलेन. पण गणेशोत्सव दणक्यातच झाला पाहिजे. माझ्या कोकणातदेखील गणेशोत्सव हा सर्वधर्मियांचा उत्सव असतो. तसेच येथेदेखील हा गणेशोत्सव सर्वधर्मियांचा आहे. प्रशासनाला मी सूचना आणि विनंतीसुद्धा करीत आहे. त्यांनी कार्यकर्त्यांवर दबाव आणू नये. पोलिस अधीक्षक व विशेष महानिरीक्षक यांच्यासह अन्य वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांशी मी स्वतः यासंदर्भात बोलतो. पण गणेशोत्सव हा मोठ्या उत्साहात साजरा झाला पाहिजे. गणेशोत्सवाच्या उत्साहामध्ये कोणतीही अडचण येणार नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांनी निश्चिंत राहावे, असे ते म्हणाले.

मलाही गळा भरून सोने घाला...

मंत्री उदय सामंत भाषण करत असताना व्यासपीठावर उपस्थित असणार्‍या एका कार्यकर्त्याच्या गळ्यातील सोने बघून सामंत म्हणाले, इतके सोने घालून आमचा कार्यकर्ता फिरतो. असेच गळा भरून सोने माझ्याही गळ्यात घाला. मला हे झेपते का बघूया. हे ऐकून यावेळी उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news