

मिरज : जिल्हा अमली पदार्थ मुक्तीच्या दिशेने महत्त्वाचे ठरणारे अद्ययावत व्यसनमुक्ती केंद्र व पुनर्वसन केंद्राचे शनिवारी लोकार्पण करण्यात आले. या केंद्रातून व्यसनाधीन लोकांवर अद्ययावत उपचार मोफत केले जाणार आहेत. याचा लाभ घेऊन जिल्हा अमली पदार्थमुक्त करण्याच्या चळवळीत योगदान द्यावे, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, मिरज येथे अद्ययावत व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे उपस्थित होते.
पालकमंत्री पाटील म्हणाले, पालकमंत्री झाल्यानंतर पहिल्या दौर्यात प्रजासत्ताकदिनी मी सांगली जिल्हा अमली पदार्थमुक्त करण्याचा संकल्प केला. त्यादृष्टीने प्रबोधन, कायद्याचा धाक आणि उपचार या त्रिसूत्रीतून आम्ही काम सुरू केले. प्रबोधनामध्ये जिल्हा परिषदेंतर्गत विविध माध्यमातून स्पर्धा घेऊन प्रबोधन केले. भावी पिढीला हा विळखा बसू नये, म्हणून अनुदानित शाळेत दररोज परिपाठाच्यावेळी अमली पदार्थविरोधी प्रतिज्ञा घेण्याची कार्यवाही सुरू आहे. कायद्याचा धाकही पोलिस दलाने निर्माण केला. यातील तिसरा टप्पा म्हणजेच अद्ययावत यंत्रसामग्रीनेयुक्त अशा व्यसनमुक्ती केंद्राचे लोकार्पण केले. या केंद्रामध्ये उपचार घेणार्या व्यसनाधीन व्यक्ती व त्यांच्या नातेवाईकांचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल. खासगी रुग्णालयात अशी उपचार पद्धती महागडी असते. पण, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, मिरज येथे मोफत उपचार केले जाणार आहेत.
अमली पदार्थ व्यसनामुळे अनेक मानसिक विकार निर्माण होतात. या व्यसनमुक्ती केंद्रात ओपिओइड्स : ब्राऊन शुगर, हेरॉइन, सायकोस्टिम्युलंट्स कोकेन, मेथाम्फेटामिन, एमडी, कॅनाबिस पदार्थ : गांजा, चरस, सिंथेटिक ड्रग्ज : स्निफिंग सोल्युशन, व्हाइटनर, झोपेच्या गोळ्या यातील व्यसनाधीन व्यक्तींवर उपचार केले जाणार आहेत. गटचिकित्सा आणि कौटुंबिक समुपदेशन या दोन पद्धतीने उपचार केले जातील. नातेवाईकासोबत राहून उपचार घेण्याची सोय आहे. औषधोपचार, मानसोपचार पद्धती, विचार व वर्तन सुधारणे व रुग्णाला उपचारासाठी तयार करणे या चार टप्प्यात उपचार केले जाणार आहेत.
हे उपचार केंद्र अद्ययावत यंत्रांनी सुसज्ज आहे. या केंद्रात मॉडिफाईड इसीटी मशीन, ‘मल्टी बिहेवियरल थेरपी’ मशीन, अव्हर्जन थेरपी मशीन, सेरेब्रल स्टिम्युलेशन मशीन, क्रॅनियल नर्व्ह स्टिम्युलेशन आणि रिपीटेटिव्ह ट्रान्सक्रॅनियल मॅग्नेटिक स्टिम्युलेशन म्हणजेच आरटीएमएस मशीन, अशा अद्ययावत यंत्रांच्या साहाय्याने उपचार केले जाणार आहेत.