

मिरज : बेडग (ता. मिरज) येथील गुंतवणूकदारांना दामदुपटीचे आमिष दाखवून तब्बल 39 लाख 23 हजार 170 रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मनोजकुमार अशोक पाटील यांनी चव्हाण याच्याविरुद्ध मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे.
याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये प्रदीप रवींद्र गर्ग (रा. मीरा रोड पूर्व, ठाणे), संजय हेमंत विश्वास (रा. मीरा रोड, ठाणे), विनोदभाई वजीरभाई पटेल (रा. कामपरडा, जि. वलसाड, गुजरात) आणि मिलिंद आनंद जाधव (रा. ठाणे) यांचा समावेश आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, वरील सर्व गुंतवणूकदारांनी मनोजकुमार पाटील यांच्यासह गुंतवणूकदारांना दामदुपटीचे आमिष दाखवले होते. यामुळे मनोजकुमार पाटील यांच्यासह गुंतवणूकदारांनी 39 लाख 23 हजार 170 रुपयांची रक्कम चौघांच्या कंपनीत गुंतवली होती. परंतु गुंतवणुकीची मुदत संपल्यानंतरदेखील चौघांनी मनोजकुमार पाटील व अन्य गुंतवणूकदारांना रक्कम लाभासह परत दिली नाही. गुंतवणूकदारांनी संशयितांकडे वारंवार रक्कम परत देण्याची मागणी केली. परंतु रक्कम देण्यास संशयितांनी सातत्याने टाळाटाळ केली. अखेर फसवणूक झाल्याचे निदर्शनास येताच मनोजकुमार पाटील यांनी प्रदीप गर्ग, संजय विश्वास, विनोदभाई पटेल, आणि मिलिंद जाधव या चौघा संशयितांविरुद्ध मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.