

सांगली : मिरज शहरातील म्हैसाळ रेल्वे उड्डाण पुलाजवळ गांजाची तस्करी करणाऱ्या हद्दपार गुन्हेगारासह दोघांना अटक करण्यात आली. हद्दपार गुन्हेगार हुसेन बादशाह सय्यद (वय 27) आणि सोहेल लालूखान पठाण (वय 20, दोघे रा. कैकाडी गल्ली, मिरज) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून दोन लाख 15 हजार रुपयांचा 7 किलो 175 ग्रॅम गांजा आणि एक लाख रुपयांची दुचाकी, असा 3 लाख 15 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक संजीव झाडे यांनी पथक नियुक्त केले होते. मिरज परिसरात उपनिरीक्षक जयदीप कळेकर यांच्यासह सुशील मस्के, ऋतुराज होळकर, सुमीत सूर्यवंशी यांचे पथक गस्तीवर असताना हद्दपार गुन्हेगार हुसेन सय्यद आणि त्याचा साथीदार सोहेल पठाण हे दोघे दुचाकीवरून येत असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. त्यानंतर तातडीने दोघांवर छापा टाकून त्यांना ताब्यात घेतले.
हद्दपार असतानाही मिरजेत प्रवेश कसा?
गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याने मिरजेतील हुसेन सय्यद याला सांगली जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले होते. परंतु हद्दपार असताना त्याने मिरजेत प्रवेश केला होता. तसेच हद्दपार असतानाही त्याने मिरजेत येऊन गांजाची तस्करी चालविली होती. हद्दपार गुन्हेगारांकडून आता शहरात येऊन गांजाची तस्करी केली जात असल्याचे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित केला जात आहे.