

मिरज : मिरज शहरातील एका आठ वर्षीय बालकाचे अपहरण करून त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पीडित मुलाच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून मिरज शहर पोलिसांनी तीन संशयितांना तात्काळ अटक केली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मिरज शहरातून आठ वर्षांचा मुलगा अचानक बेपत्ता झाला होता. बालकाच्या ओळखीचा फायदा घेत तिघा संशयितांनी त्याचे अपहरण केले. त्यानंतर त्याला मिरज-मालगाव रस्त्यावरील एका निर्जन स्थळी नेऊन त्याच्यावर अनैसर्गिक कृत्य केले. आपला मुलगा गायब झाल्याचे लक्षात येताच पीडित मुलाच्या आईने मिरज शहर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवून शोध घेतला असता हा अत्यंत गंभीर व विकृत प्रकार उघडकीस आला. मिरज शहर पोलिसांनी तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्यावर बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण (पोक्सो) कायद्यासह भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.