

मिरज : येथे नवव्या दिवशी निघालेल्या श्री गणेश विसर्जन मिरवणुकीत ध्वनिप्रदूषणाचे नियम धाब्यावर बसवून डीजेचा दणदणाट करणाऱ्या १५ गणेशोत्सव मंडळांवर मिरज शहर पोलिसांनी कारवाई केली. पोलिसांनी आधीच सूचना देऊनही या मंडळांनी आवाजाच्या मर्यादेचे थेट उल्लंघन केल्याने ही कायदेशीर कारवाई करण्यात आली.
मिरज शहर पोलिसांनी गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीसाठी १ बेस व १ टॉप वापरण्याची मुभा दिली होती, तसेच आवाजाची कमाल मर्यादा ७५ डेसिबल निश्चित केली होती. मात्र, मिरजेतील मुख्य विसर्जन मार्गावरून जाताना अनेक मंडळांनी या नियमांना केराची टोपली दाखवली.
कारवाई करण्यात आलेल्या १५ मंडळांमध्ये एकता मित्र मंडळ, जनहिताचा राजा गणेशोत्सव मंडळ, शिवराज मित्र मंडळ, श्री स्वराज्य गणेशोत्सव मंडळ, शक्ती ग्रुप गणेशोत्सव मंडळ, बाळसम्राट मित्र मंडळ, बसवेश्वर गणेशोत्सव मंडळ, अष्टविनायक गणेशोत्सव मंडळ, विद्यानगर गणेशोत्सव मंडळ, श्री सदाशिव मंडळ, ओंकार गणेशोत्सव मंडळ, संयुक्त रॉयल दोस्ती गणेशोत्सव मंडळ, श्री गजानन गणेशोत्सव मंडळ, कोल्हापूर चाळचा किंग श्री गणेश मित्र मंडळ आणि शिवयुवा शक्ती गणेशोत्सव मंडळ यांचा समावेश आहे. या सर्व मंडळांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मिरज येथे नवव्या दिवशी निघालेल्या श्री गणेश विसर्जन मिरवणुकीत नियमांचे उल्लंघन करून डीजेचा दणदणाट करत विसर्जन मिरवणूक रेंगाळवल्याप्रकरणी मुरलीधर गणेशोत्सव मंडळाच्या ५ सदस्यांसह डीजे मालकाविरुद्ध मिरज शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलिसांनी या कारवाईत लाखो रुपयांची डीजे सिस्टिम जप्त केली आहे.
गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांमध्ये सुनील धोंडिराम इंगोले (वय ३५), निशांत शिवाप्पा म्हेत्रे (वय ३८), विशाल मारुती गवळी (वय ४०), ओंकार राजू रजपूत (वय ३०), शिवराज प्रकाश पाटील (वय ३५, सर्व रा. हिरेमठ गल्ली, मिरज) आणि डीजे मालक प्रशांत मदन बराडे (वय ४५, रा. समर्थनगर, बेळगाव) या ६ जणांचा समावेश आहे. हिरेमठ गल्ली येथील मुरलीधर गणेशोत्सव मंडळाच्या मूर्तीचे नवव्या दिवशी विसर्जन करण्यात आले.