

मिरज : शहरातील डोणगे गल्ली येथे अंगणात काढलेल्या रांगोळीवर पाणी टाकल्याच्या वादातून झालेल्या हल्ल्यात एका व्यक्तीचा निर्घृण खून करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी संशयितास अटक केली असून ऐन दिवाळीत भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.
इलाही लालसाब शेख (वय ५५, रा. डोणगे गल्ली, मिरज) असे मृताचे नाव आहे. या खूनप्रकरणी आशिष बसवराज जयगोंड (वय २२, रा. डोणगे गल्ली, मिरज) याला मिरज शहर पोलिसांनी अटक केली असून, न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी मृत इलाही शेख यांची मुलगी समिना इलाही शेख यांनी फिर्याद दिली आहे.
सुतारकाम करणारे इलाही शेख व आशिष जयगोंड हे डोणगे गल्लीत एकमेकांच्या शेजारी राहतात. यांच्यामध्ये गेल्या दोन-तीन वर्षांपासून किरकोळ कारणांवरून वाद सुरू होता. मंगळवारी दिवाळी असल्याने आशिष जयगोंड याचे नातेवाईक अंगणात रांगोळी काढत होते. यावेळी जयगोंडच्या नातेवाईकांशी आणि इलाही शेख यांच्यामध्ये येण्या-जाण्याचा रस्ता एकच असल्याने रांगोळी काढण्यावरून वाद झाला.
यानंतर इलाही शेख यांनी त्यांच्या दारामध्ये पाय धुतले. पाय धुतलेले पाणी जयगोंड यांनी काढलेल्या रांगोळीवर आल्याने दोन्ही कुटुंबामध्ये पुन्हा वादावादी व हाणामारीचा प्रकार घडला. त्यावेळी मध्यस्थांनी हा वाद मिटवला होता. त्यानंतर इलाही शेख हे घटनास्थळावरून निघून गेले होते. परंतु या वादाचा राग संशयित आशिष जयगोंड याच्या मनामध्ये होता. मंगळवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास धारदार हत्यारासह आशिष हा घराकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर इलाही त्यांना जाब विचारण्यासाठी थांबला होता.
जुन्या भांडणाचा व कुटुंबाला झालेल्या मारहाणीचा राग मनात धरून, दुपारी इलाही शेख हे दुचाकीवरून घरी परतत असताना डोणगे गल्लीत दिलीप टाकवडे यांच्या घरासमोर संशयित आशिष याने त्यांना अडवले. यावेळी ‘माझ्या दारातील रांगोळीवर पाणी का सांडले’, असा जाब विचारला. यावेळी झालेल्या वादातून आशिषने त्यांच्या छातीवर व मानेवर धारदार कोयत्याने सपासप वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेले इलाही शेख यांचा जागीच मृत्यू झाला.
इलाही हे रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर आशिष याने घटनास्थळावरून पलायन केले. दरम्यान मिरज शहर पोलिसांनी संशयीत आशिष जयगोंड याला अटक केली आहे. गुन्ह्यात वापरलेला कोयता जप्त केला. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस निरीक्षक किरण चौगुले करीत आहेत.
कुटुंबीयांना मारहाणीच्या वादातून सुडाची भावना
रांगोळीवर पाणी ओतण्याच्या कारणातून शेख कुटुंबाकडून आशिष याच्या कुटुंबातील सदस्यांना मारहाण करण्यात आली होती. याचा राग त्याच्या मनामध्ये होता. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून सुरू असणारा वाद मंगळवारी टोकाला गेला. या वादामध्ये कुटुंबांना झालेली मारहाण आशिष याच्या मनात होता आणि त्याच रागातून त्याने हा खून केल्याचे समोर आले आहे.
डोणगे गल्लीत तणावपूर्ण शांतता
शेजाऱ्यांमधील या खुनाच्या घटनेनंतर डोणगे गल्ली परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी घटनास्थळी दंगल नियंत्रण पथकासह मोठा पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला असून, सध्या परिसरात तणावपूर्ण शांतता आहे.