

सांगली : मिरज एमआयडीसी परिसरामध्ये अन्न व औषध प्रशासनाने शुक्रवारी (१२ जून) ''मे. मालगावे मिल्क आणि मिल्क प्रॉडक्ट'' दुग्धजन्य पदार्थ निर्मिती कारखान्यावर छापा टाकला. या कारवाईत प्रशासनाने तब्बल २,६२,११६ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून संशयास्पद दूध जागेवरच नष्ट केले आहे.
राज्य अन्न व औषध प्रशासन विभागाचे नवनियुक्त आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारताच संपूर्ण महाराष्ट्रात भेसळखोरांविरुद्ध कारवाईचा धडाका सुरू केला आहे. त्यांच्या या कडक भूमिकेच्या पार्श्वभूमीवर, सांगलीतील अन्न व औषध प्रशासन विभाग काय करीत आहे? असा सवाल उपस्थित करीत भेसळीची वस्तुस्थिती दैनिक ‘पुढारी’ने मांडली होती . त्यानंतर आता अन्न औषध विभाग सक्रिय झाल्याचे दिसत आहे.
मिरज एमआयडीसी परिसरामधील गोविंदरावजी मराठे इंडस्ट्रियल इस्टेटमधील प्लॉट नंबर ९५ येथे कार्यरत असलेल्या ''मे. मालगावे मिल्क आणि मिल्क प्रॉडक्ट'' या आस्थापनेची अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाकडून तपासणी करण्यात आली. या तपासणीदरम्यान सदर कारखान्यामध्ये अन्नपदार्थ तयार करताना ''अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६'' मधील तरतुदींचे गंभीर उल्लंघन होत असल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. कारखान्यातील अस्वच्छता आणि संशयास्पद साहित्याचा वापर पाहून पथकाने तातडीने कारवाईचा बडगा उगारला.
या धडक कारवाईदरम्यान भेसळीच्या व अप्रमाणित असल्याच्या संशयावरून कारखान्यातून म्हशीचे दूध, क्रीम, पनीर, स्किमड् मिल्क पावडर, ग्लिसरील मोनो स्टीरेट आणि रिफाइंड पामोलीन तेल या अन्नपदार्थांचे नमुने घेण्यात आले. तसेच मानवी आरोग्याला घातक ठरू नये म्हणून तब्बल ४५८ लिटर दूध जागेवरच नष्ट करण्यात आले आणि अंदाजे ६७३ किलोग्राम वजनाचा अन्नपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला. ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या आणि नियमांना धाब्यावर बसवणाऱ्या या ''मे. मालगावे मिल्क आणि मिल्क प्रॉडक्ट'' या आस्थापनेचा अन्न परवाना देखील अन्न व औषध प्रशासनाने तातडीने आणि तत्काळ प्रभावाने निलंबित केला आहे. त्यामुळे पुढील आदेश येईपर्यंत या कारखान्यातील सर्व प्रकारचे उत्पादन व विक्री पूर्णपणे बंद राहणार आहे.
ही कारवाई अन्न व औषध प्रशासन सांगली कार्यालयाचे सहायक आयुक्त रावसाहेब समुद्रे यांच्या उपस्थितीत, मार्गदर्शनाखाली पार पडली. या मोहिमेत अन्न सुरक्षा अधिकारी सु. स. खांडेकर, ध. वि. आघाव, तु. बा. घुमरे आणि अ. अ. पवार यांनी केली.