

मिरज ः प्रेमविवाह केल्याच्या रागातून मिरजेतील सुभाषनगर येथील तरुणास व त्याच्या पत्नीस मेहुणा, सासू व त्यांच्या साथीदारांनी बेदम मारहाण केली. याप्रकरणी मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाणीत संदेश नवनाथ लोंढे (वय 36, रा. मदिना मशीदशेजारी, सुभाषनगर, मिरज) हा जखमी झाला आहे.
संदेश लोंढे व आश्विनी सदामस्त यांनी प्रेमविवाह केला आहे. या रागातून आश्विनीचा भाऊ आकाश बाळू सदामस्त याने मोबाईलवरून संदेश यास शिवीगाळ व दमदाटी केली. त्यानंतर संदेश व आश्विनी घरी असताना अश्विनीचे भाऊ आकाश बाळू सदामस्त, आशिष बाळू सदामस्त, आई सुनीता बाळू सदामस्त (रा. शामरावनगर, सांगली), किशोर गणपती कट्टे, अंशु किशोर कट्टे व सुजल किशोर कट्टे (रा. आंबेडकरनगर, सांगली) त्यांच्या घरात घुसले. संदेश यास लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. आकाश सदामस्त याने प्लास्टिकची बादली कमरेवर मारली, आशिष सदामस्त याने घरातील काचेचा आरसा डोक्यात मारून त्यास गंभीर जखमी केले. किशोर व सुजल कट्टे यांनीही संदेश यास तोंडावर लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. पतीला सोडवण्यासाठी पत्नी आश्विनी धावून आली असता आई सुनीता सदामस्त, पूजा सदामस्त व अंशु कट्टे यांनी तिला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केल्याची तक्रार आहे. याप्रकरणी मिरज ग्रामीण पोलिसांनी सहाजणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.