Hasan Mushrif| मिरज सिव्हिलमध्ये सुपरस्पेशालिटी, कॅन्सर रुग्णालय लवकरच

वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती
Hasan Mushrif
Hasan Mushrif
Published on: 
Updated on: 

मिरज : मिरज शासकीय रुग्णालयामध्ये २५० खाटांचे सुपरस्पेशालिटी आणि २५० खाटांचे कॅन्सर रुग्णालय उभारण्यास लवकरच मंजुरी देण्यात येईल, अशी माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी दिली.

मिरज शासकीय रुग्णालयात नियमित गट 'ड' (वर्ग-४) सरळसेवा पदभरती प्रक्रियेमधील अंतिम निवड यादीतील उमेदवारांच्या नियुक्ती आदेशांचे वितरण मुश्रीफ यांच्याहस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला आमदार सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. रूपेश शिंदे यांच्यासह डॉक्टर आणि कर्मचारी उपस्थित होते.

मंत्री मुश्रीफ म्हणाले, मिरज शासकीय रुग्णालयामध्ये सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला होता; मात्र तो नामंजूर झाला आहे. त्यामुळे आता राज्य शासनाकडूनच याबाबत कार्यवाही करण्यात येणार असून २५० खाटांचे सुपरस्पेशालिटी व २५० खाटांचे कॅन्सर रुग्णालय सुरू करण्यास लवकरच मंजुरी दिली जाईल. आम्ही पेपर फोडून किंवा वशिलेबाजी करून नोकऱ्या देत नाही, तर पात्रता असणाऱ्यांनाच संधी दिली जाते. तीच पारदर्शक प्रक्रिया या भरतीत राबवण्यात आली आहे. एमपीएससीमार्फत नर्सिंग स्टाफची भरती होईपर्यंत वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील रिक्त जागा तत्काळ कंत्राटी पद्धतीने भरल्या जातील.

स्थानिक आमदारांकडून मिरज व सांगली सिव्हिल रुग्णालयाबाबत अनेक मागण्या करण्यात आल्या असून त्या पूर्ण केल्या जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली. मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये 'पीपीपी' तत्त्वावर कॅथलॅब सुरू करण्याचा प्रस्ताव आहे; मात्र त्याला वेळ लागू शकतो. त्यामुळे दुसरा पर्याय तयार करून कोणत्याही परिस्थितीत येथे कॅथलॅब सुरू केले जाईल. तसेच, महाविद्यालयातील स्वागत कमान दुर्घटनेबाबत चौकशी समिती नेमली असून, त्याचा अहवाल विधानसभेत सादर केला जाईल, असेही मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.