

मिरज : गरजू रुग्णांना मोठा आधार असणार्या मिरजेच्या शासकीय रुग्णालयामध्ये अनेक उपचारांचे विभाग हे अत्याधुनिक तंत्रसुविधांयुक्त झाले आहेत. रुग्णालयात काही कामे सुरू आहेत, तर काही कामे निधीमुळे प्रलंबित आहेत. त्यांचे प्रस्ताव शासनाने त्वरित मंजूर करण्याची आवश्यकता आहे. शिवाय केवळ घोषणा होणारे सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल कधी सुरू होणार?
मिरजेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय आहे. सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यांसह कर्नाटक राज्यातूनही अनेक गरजूंना येथे मोठी आरोग्य सेवा दिली जाते. अनेक उपचार येथे मोफत व अत्यल्प दरामध्ये असल्याने रुग्णांना त्याचा फायदा होतो. या रुग्णालयामध्ये दररोज सुमारे सातशे ते 1000 रुग्णांची बाह्यरुग्ण विभागामध्ये तपासणी होते. महाराष्ट्रात कोणत्याही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व शासकीय रुग्णालयामध्ये स्कील लॅब नव्हती. त्यामुळे एमबीबीएस व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना पुस्तके वाचूनच प्रशिक्षण घ्यावे लागत होते. मात्र आता मिरजेतील शासकीय रुग्णालयात स्कील लॅब झाल्याने प्रत्यक्षात उपचाराबाबत प्रॅक्टिस करून प्रशिक्षण घेतले जात आहे.
हे रुग्णालय सुरू झाल्यापासून भुयारी गटार व सांडपाण्याची निचरा करण्याची सोय नव्हती. प्रशासनाने राज्य शासनाकडे याबाबत प्रस्ताव पाठवला होता. त्यामुळे राज्य शासनाने भुयारी गटार व सांडपाणी निचरा करण्यासाठी सुमारे 18 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. या रुग्णालयात अग्निशमन विभाग सुधारण्यासाठी शासनाकडून निधी मंजूर झाला आहे. कान, नाक, घसा याच्या उपचारासाठी अत्याधुनिक डेरा मशीन व मायक्रोस्कोप मशीनची सुविधा आहे. त्याच्यावर आता रुग्णांना उपचार दिला जात आहे. बिनटाक्याची शस्त्रक्रिया करण्यासाठी लॅप्रोस्कोपी सुविधा आहे. डोळ्यांच्या उपचारांसाठीही अत्याधुनिक फेको मशीन सुरू आहे. हृदयाच्या तपासणीसाठी व सोनोग्राफीसाठी नवीन इको कार्डिओ मशीन आहे.
रुग्णालयामध्ये पूर्वी 25 व्हेंटिलेटर होते. मात्र कोरोनाच्या कालावधीमध्ये येथे कोविड सेंटर सुरू होते. त्यामुळे शंभर व्हेंटिलेटर खरेदी केले होते. एकूण सव्वाशे व्हेंटिलेटर येथे आहेत. भविष्यात व्हेंटिलेटरची कमतरता भासणार नाही. येथे सात डायलेसिस मशीन्स आहेत. दररोज 25 ते 30 रुग्णांना त्यांचा फायदा होतो. एचआयव्ही रुग्णांसाठी स्वतंत्र, कावीळ रुग्णांसाठी स्वतंत्र डायलिसिस मशीन आहे. अतिदक्षता विभाग व शस्त्रक्रिया थिएटर अत्याधुनिक करण्यासाठी प्रशासनाने राज्य शासनाकडे गेल्यावर्षी प्रस्ताव पाठविला होता. त्यानुसार वैद्यकीय तंत्रशिक्षण विभागाने सुमारे 25 कोटी रुपये मंजूर केले. दोन टप्प्यांमध्ये हे काम पूर्ण होणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये काम पूर्ण झाले आहे. अतिदक्षता विभागामध्ये पूर्वी साधे बेड वापरले जात होते. आता मात्र अत्याधुनिक असे रिमोटवर चालणारे बेड उपलब्ध झाले आहेत. एकूण 50 बेड येथे उपलब्ध असणार आहेत. त्यापैकी 25 बेड उपलब्ध झाले आहेत. या प्रत्येक बेडला व्हेंटिलेटर व मॉनिटर असणार आहे.
ऑपरेशन थिएटर देखील मॉड्युलर पद्धतीचे करण्यात आले आहे. एकूण दहा थिएटर्स अत्याधुनिक केली जात आहेत. त्यापैकी चार थिएटर तयार झाली आहेत. नाक, कान, घसा, पोटविकार, हाडांवरील शस्त्रक्रिया यासाठी या चारही थिएटर्सचा वापर सुरू आहे. या थिएटर्समुळे रुग्णांना इन्फेक्शन होणार नाही, अशी व्यवस्था झाली आहे. या रुग्णालयामध्ये सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू करण्याची घोषणा यापूर्वी केली होती. केंद्रीय मंत्र्यांनी या रुग्णालयास भेट दिली होती. केंद्र शासनाकडे याबाबतचा प्रस्ताव प्रलंबित आहे. तो मंजूर झालेला नाही. केंद्र सरकारने जर हे सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू केले नाही, तर राज्य शासन ते सुरू करेल, अशी घोषणा मंत्री हसन मुश्रीफ यांनी पंधरा दिवसांपूर्वी मिरजेत केली. जर राज्य शासन असे हॉस्पिटल सुरू करू शकते, तर मग केंद्राकडे प्रस्ताव पाठविण्याची गरज होती का? केंद्र शासनाची प्रतीक्षा न करता राज्य शासनानेच हे हॉस्पिटल त्वरित सुरू करण्याची मागणी केली जात आहे.
एमबीबीएसचे 1200 व पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे 300 असे सुमारे पंधराशे विद्यार्थी येथे वैद्यकीय प्रशिक्षण घेत आहेत. या दीड हजार विद्यार्थ्यांसाठी केवळ निम्म्याच विद्यार्थ्यांना वसतिगृहाची सोय आहे. त्यातही अनेक विद्यार्थी एका खोलीमध्ये तीन, चार ते पाचजण राहतात. त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होते. येथे वसतिगृह नव्याने बांधण्याची गरज होती. त्यानुसार केंद्र शासनाने 60 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यातून 2 वसतिगृहे, 2 प्रॅक्टिकल हॉल, 2 लेक्चर हॉल बांधण्यात येत आहेत. वसतिगृहांमुळे सुमारे 400 विद्यार्थ्यांची सोय होणार आहे.