

मिरज : मिरज शासकीय रुग्णालयातून अर्भकाच्या अपहाराची घटना घडूनदेखील अद्याप या ठिकाणी सुरक्षेचा ढिसाळपणाच दिसून येतो. ज्या ठिकाणाहून बाळाचे अपहरण झाले, त्या ठिकाणी मात्र कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मात्र अद्याप ओपीडीमध्ये कोणीही सुरक्षारक्षक नसल्याचे दिसून येते. तसेच या ठिकाणी असणारे पोलिस मदत केंद्र देखील बंद स्वरूपात आहे.
मिरज शासकीय रुग्णालयातून अपहरण झालेले बाळ सुदैवाने सुखरूप मिळाले. या प्रकरणामध्ये मिरज शासकीय रुग्णालयाचा विस्कळीत कारभार समोर आला. पोलिसांनी कसोशीने प्रयत्न केल्याने या प्रकरणाचा छडा लागला. मात्र बाळाचे अपहरण झाल्यानंतर पोलिसांत लवकर फिर्याद देण्याची तसदीदेखील रुग्णालय प्रशासनाने घेतली नव्हती. एवढी गंभीर घटना घडूनदेखील रुग्णालय प्रशासनाचे डोके अद्याप ठिकाणावर आल्याचे दिसून येत नाही. कारण रुग्णालयाच्या आवारात सर्वत्र सुरक्षा रक्षकांची नियुक्ती केल्याचे दिसून येत नाही. रुग्णालयाच्या ज्या आयपीडीमधून बाळाचे अपहरण झाले, त्याठिकाणी मात्र चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. परंतु ओपीडीमध्ये कोणीही सुरक्षारक्षक नियुक्त नसल्याचे चित्र होते.
रुग्णालयाच्या ओपीडीच्या प्रवेशद्वारापर्यंत रिक्षा, खासगी वाहने थांबविण्यात येत आहेत. या ठिकाणी येणार्या वाहनांची कोणत्याही प्रकारची चौकशी केली जात नाही. त्यामुळे रुग्णालय प्रशासन आणखी एखादी मोठी घटना घडण्याची वाट पाहत आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. वैद्यकीय अधीक्षकांच्या कार्यालयाजवळ चार ते पाच सुरक्षा रक्षकांची नियुक्ती केल्याचे दिसून येते. वैद्यकीय अधिकार्यांच्या सुरक्षेसाठी सुरक्षारक्षक हवेत, मग या ठिकाणी येणारे रुग्ण, त्यांचे नातेवाईक, प्रसूतीसाठी आलेल्या महिला यांच्या सुरक्षेचे काय? रुग्णालय आवारात इतकी मोठी घटना घडूनदेखील सर्वसामान्य जनतेची सुरक्षा मात्र अद्याप वार्यावरच असल्याचे दिसून येते. सुरक्षेच्या कारणास्तव या ठिकाणी एक पोलिस मदत केंद्र देखील उभारण्यात आले आहे. परंतु ते बंद अवस्थेत आहे. येथे सुरक्षा पुरविण्यासाठी पोलिस ठाण्याकडे पुरेसे कर्मचारी उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे या ठिकाणी नियुक्त करण्यात आलेल्या महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या कर्मचार्यांनाच सर्वत्र नियुक्त करणे गरजेचे आहे.