

मिरज : शहरातील नदाफ गल्ली सांगली वेस या परिसरात कचरा उठाव न केल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी मनपाचा निषेध नोंदवत महापालिकेच्या मिरज विभागीय कार्यालयात शनिवारी कचरा फेकण्याचा प्रयत्न केला.
बकरी ईदनिमित्त शहरात सर्वत्र स्वच्छता करण्याचा निर्णय महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने घेतला होता. याबाबत शहरातील अनेक भागामध्ये कचरा उठाव करून स्वच्छता करण्याचा आदेश अधिकार्यांनी दिला होता. मात्र शहरातील नदाफ गल्ली व सांगली वेस या परिसरात कंटेनर भरून कचरा रस्त्यावर पडला होता. नागरिकांनी तक्रार करूनही हा कचरा उचलला नव्हता. संतप्त झालेले या परिसरातील काही नागरिक कचरा व बकरी कापल्यानंतर त्याची निर्माण होणारी घाण घेऊन थेट महापालिकेत पोहोचले. काल बकरी ईदनिमित्त महापालिकेला सुटी होती.
पण दरवाजा उघडून हे संतप्त झालेले नागरिक घाण घेऊन मनपाच्या कार्यालयात घुसले. यावेळी या नागरिकांनी स्वच्छता न झाल्याने महानगरपालिकेच्या विरोधात निषेध नोंदविला. त्यानंतर सहायक आयुक्त अनिस मुल्ला तेथे आले. त्यांनी नागरिकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण नागरिकांच्या संतप्त भावना होत्या.
काही वेळाने पोलिसही तेथे पोहोचले. पोलिसांनीही नागरिकांना येथे कचरा टाकण्यास मज्जाव केला. महापालिकेच्या आरोग्य विभागाचे कर्मचारी स्वच्छता करण्यासाठी सांगली वेस व नदाफ गल्ली येथे पोहोचले. काही वेळात येथील कचरा उचलून परिसर स्वच्छ करण्यात आला. त्यामुळे नागरिक महानगरपालिकेत घाण न टाकता तेथून निघून गेले.