Miraj News : मिरजेत छत्रपती संभाजी महाराजांच्या भव्य स्मारकास शासनाची मंजुरी

१५ फुटी पूर्णाकृती पुतळा; शिवसृष्टीच्या माध्यमातून इतिहासाला उजाळा
Miraj News
मिरजेत छत्रपती संभाजी महाराजांच्या भव्य स्मारकास शासनाची मंजुरी
Published on
Updated on

मिरज : मिरज शहराच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला जाणार असून, छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास शासनाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे मिरजेत छत्रपती संभाजी महाराजांची भव्य शिवसृष्टी व स्मारक उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, अशी माहिती नगरसेवक करण जामदार यांनी रविवारी दिली

ते म्हणाले, छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाची, त्यागाची आणि स्वराज्यनिष्ठेची गाथा महाराष्ट्राच्या इतिहासात अजरामर आहे. त्यांच्या शौर्याचे स्मरण पुढील पिढ्यांना व्हावे, तसेच मिरज शहराच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वैभवात भर पडावी, यादृष्टीने महाराजांचे स्मारक व्हावे यासाठी गेल्या चार वर्षांपासून आम्ही प्रयत्न करीत होतो. राज्य शासनाकडून सर्व विभागाची परवानगी मिळाली आहे. सांगलीचे जिल्हाधिकारी व जिल्हा पुतळा समितीचे अध्यक्ष मैनाक घोष यांनी याबाबतचा आदेश देखील काढला आहे. शासनाच्या मंजुरीनंतर आता स्मारकाच्या उभारणीसाठी पुढील प्रक्रिया सुरू होणार आहे.

प्रस्तावित शिवसृष्टीमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभारण्याबरोबरच त्यांच्या जीवनकार्याची आणि स्वराज्यासाठी दिलेल्या बलिदानाची माहिती देणारे विविध घटक उभारण्याची अपेक्षा आहे. मिरज-बेडग रोडवरील जुन्या काच कारखान्यासमोर महानगरपालिकेचा सुमारे एक एकरहून अधिक खुला भूखंड आहे. या भूखंडावर हे स्मारक होणार आहे. या भूखंडाचा ठराव यापूर्वी मंजूर झाला आहे. त्याला सूचक म्हणून करण जामदार व अनुमोदक म्हणून नगरसेवक दयानंद खोत होते. माजी महापौर किशोर जामदार, भाजपचे दिगंबर जाधव यांनी देखील पाठपुरावा केला. त्यामुळे हे ठिकाण केवळ पुतळ्यापुरते मर्यादित न राहता इतिहास, शौर्य आणि प्रेरणेचे केंद्र ठरू शकते. मिरजेच्या ऐतिहासिक भूमीवर उभारण्यात येणारे हे स्मारक शहराच्या सांस्कृतिक ओळखीला नवी दिशा देणारे ठरणार आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या विचारांचा आणि पराक्रमाचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी शिवसृष्टी महत्त्वाची भूमिका बजावेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news