

सांगली : मिरजच्या भुईकोट किल्ल्याच्या खंदकात दुर्मिळ गोरक्षण वीरगळ आढळून आला आहे. इतिहास अभ्यासक मनोज उदगांवे यांना किल्ला परिसरात आढळलेला हा गोरक्षणचा पहिलाच वीरगळचा असल्याने मिरजेच्या इतिहासाच्या अभ्यासात मोलाची भर पडणार आहे.
हा वीरगळ तीन भागांत उपलब्ध असून तळाच्या भागात तीन गाईंच्या प्रतिमा कोरलेल्या असून, मधील भागात गोधन पळवून नेणाऱ्या शत्रूंशी एक वीर भाला हातात घेऊन लढताना दर्शविण्यात आला आहे. त्यावरील भागात गोधनाचे रक्षण करताना वीरमरण आलेल्या त्या योद्ध्याचे स्वर्गारोहण झाल्याचे शिल्पांकन केल्याचे दिसून येते. वीरगळाचा सर्वात वरचा भाग तुटलेला असल्याने तो उपलब्ध नाही. अशा प्रकारच्या वीरगळांच्या परंपरेप्रमाणे त्या भागात शिवलिंगाची पूजा अथवा तसेच काही वीरगळांमध्ये सूर्य आणि चंद्र प्रतिमा कोरलेली आढळते.
इतिहास संशोधकांच्या मते, प्राचीन काळात गोधन हेच खरे धन मानले जात असे. त्यामुळे गोधन पळवून नेणाऱ्या शत्रू किंवा परचक्राशी झुंज देताना प्राणार्पण करणाऱ्या वीरांच्या स्मरणार्थ गोरक्षण वीरगळ उभारण्याची परंपरा होती. अशा वीरगळांमध्ये तळाशी गोधन, मध्यभागी युद्धदृश्य, त्यावरील भागात वीराचे स्वर्गात स्वागत आणि सर्वात वरच्या भागात शिवपूजेचे शिल्प अशी रचना आढळते.
मिरजमध्ये आढळलेला हा गोरक्षण वीरगळ ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि शिल्पकलेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जात असून, या शोधामुळे मिरज परिसरातील मध्ययुगीन इतिहासाच्या अभ्यासाला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या संशोधन कार्यात इतिहास अभ्यासक मनोज उदगांवे यांना महेश कदम, सोमनाथ पतंगे आणि उमेश काडापुरे यांचे सहकार्य लाभले.