

सांगली : “प्रसन्न वदने प्रसन्न होसी निजदासां
क्लेशांपासुनि सोडवी तोडी भवपाशां
अंबे तुजवाचुन कोण पुरविल आशा
नरहरी तल्लीन झाला पद पंकज लेशा...”
अंबामाते, तुझ्याशिवाय आमची मनोकामना, आशा कोण पूर्ण करणार, असं विनवणाऱ्या भक्तांना देवी प्रसन्न झाल्याची भावना होते आहे. मिरजनगरीत ब्राम्हणपुरीत असलेल्या प्राचीन अंबाबाई मंदिराचं रूप पालटत आहे. अंदाजे 450 वर्षांपूर्वीचं हे मंदिर आता रेखीव, दगडी, सुबक, सुंदर रूपात उभं राहताना बघण्यातली प्रसन्नता शेकडो भक्त अनुभवत आहेत.
श्री अंबाबाई म्हणजे मिरजकरांची ग्रामदेवता. ब्राम्हणपुरीतलं देवीचं मंदिर म्हणजे मिरजकरांसोबत तमाम देवीभक्तांचं श्रध्दास्थान. चंदूरकर देशपांडे यांच्या दृष्टांतातून साकारलेलं हे मंदिर प्राचीन म्हणजे अंदाजे 450 वर्षं जुनं आहे. तेव्हा ते अगदी साधं कौलारू होतं. सभागृह आणि दगडी गर्भगृह. त्यानंतर कैक वर्षांनी म्हणजे 1980 साली म. द. करमरकर यांच्या अध्यक्षतेखाली बापूसाहेब गुरव, गजानन गुरव, भानुदास गुरव, राम गुरव, अण्णासाहेब देशपांडे आणि भाविकांनी सभागृहाचं नूतनीकरण करण्याचं ठरवलं आणि लोकवर्गणीतून नूतनीकरण झालं. मंदिराला पूर्वीपासून शिखर नव्हतं. मग सन 2008 साली शिखर बांधलं. 2024 साली सभागृहाला तडे जाऊ लागले आणि विश्वस्त मंडळानं सारं मंदिरच कोरीव दगडी बांधकामात उभं करायचा निर्णय घेतला.
जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्याकडं तसा रितसर प्रस्ताव दिला. सोबत विश्वस्तांनीही विविध ठिकाणी भेटी देऊन दगडी बांधकाम करणाऱ्या कारागिरांची शोधमोहीम सुरू ठेवली. डॉ. खाडे यांनी राज्य पर्यटन विभागाच्या माध्यमातून मंदिर बांधकाम व परिसर विकासासाठी 5 कोटी 18 लाख मंजूर करून घेतले. त्यानुसार 3 कोटी वर्गही करण्यात आले आणि सौ. व श्री. डॉ. सुरेश खाडे यांच्याहस्ते भूमिपूजन करून कामाचा श्रीगणेशा झाला.
आज या कामांपैकी तळघरामधील काम पूर्ण होत आले आहे. सारे काम पूर्ण व्हायला दोन वर्षं लागणार आहेत. मंदिराचा परिसर विकसित करण्यात येणार आहे. आर्किटेक्ट डॉ. सतीश कमाने, कॉन्ट्रॅक्टर रजपूत आणि दगडी बांधकाम करणारे लोहार यासाठी कार्यरत आहेत.