Miraj News : मिरजेत ५० लाखांचा काँक्रीट रस्ता फोडला

सबकाॅन्ट्रॅक्टरच्या चुकीमुळे रस्त्यावर पाणी; महापालिकेच्या कारभाराचा आणखी एक नमुना उघड
Miraj News
मिरजेत ५० लाखांचा काँक्रीट रस्ता फोडला
Published on
Updated on

मिरज : गुरुवार पेठेतील शेतकरी चौकातील सुमारे ५० लाख रुपये खर्चून नव्याने करण्यात आलेला काँक्रीटचा रस्ता सबकॉन्ट्रॅक्टरच्या चुकीच्या कामामुळे पुन्हा फोडण्यात आला आहे. महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचा हा आणखी एक कारनामा समोर आल्याने नागरिकांत तीव्र असंतोष पसरला आहे.

गुरुवार पेठेतील शेतकरी चौक ते महादेव मंदिर यादरम्यानच्या रस्त्याचे ट्रिमिक्स काँक्रिटीकरण 'रिलायंट बिल्डअप्‌' या ठेकेदाराला देण्यात आले होते. या मुख्य ठेकेदाराने हे काम सबकॉन्ट्रॅक्टर गिडवाणी यांना दिले. काम सुरू असतानाच स्थानिक नागरिकांनी चुकीच्या कामाबाबत तक्रारी केल्या होत्या; मात्र त्याकडे अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले. काम पूर्ण झाल्यानंतर अनेक ठिकाणी पाणी साचू लागल्याने नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला. याची दखल महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना घ्यावी लागली. चुकीच्या पद्धतीने झालेल्या ठिकाणी दुरुस्ती करण्याची नोटीस महापालिकेने संबंधित मुख्य ठेकेदाराला दिली.

काही ठिकाणी रस्ता फोडून पॅचवर्क करण्यात आले. मात्र तरी देखील पाणी साचू लागले. त्यामुळे हा रस्ता पुन्हा खोदण्याचे काम सुरू करण्यात आले. रस्ता करताना या परिसरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागला होता. आता पुन्हा रस्ता खोदला जात आहे. त्यामुळे येथील नागरिक पुन्हा आक्रमक झाले आहेत. हा रस्ता पुन्हा चांगल्या दर्जाचा त्वरित करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

घाईगडबडीत रस्ता पुन्हा दर्जेदार होणार का?

काही दिवसांवर गणेशोत्सव आणि त्यानंतर नवरात्रोत्सव येऊन ठेपला आहे. हे सण-उत्सव सुरू होण्यापूर्वी या रस्त्याचे काम पूर्ण होणार का आणि ते तरी दर्जेदार असणार का, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. चुकीचे काम करणाऱ्या संबंधित कॉन्ट्रॅक्टरला 'ब्लॅक लिस्ट'मध्ये टाकावे, अशी मागणीही जोर धरत आहे.

प्रशासनाच्या सूचनेनुसारच पुन्हा काम सुरू : ठेकेदार

याबाबत सबकॉन्ट्रॅक्टर गुलाब गिडवाणी म्हणाले, रस्त्यावर पाणी साठत असल्याने महापालिका प्रशासनाच्या सूचनेनुसारच हे काम पुन्हा हाती घेण्यात आले आहे. पाणी साचू नये म्हणून रस्ता फोडला जात असून, येत्या दोन दिवसांत हे काम पूर्ण केले जाईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news