

मिरज : जिल्ह्यातील उत्सवाचे आकर्षण असलेली मिरजेतील गणेश विसर्जन मिरवणूक यंदा तब्बल 33 तास चालली. मागील वर्षी ती 25 तास चालली होती. यंदा आठ तास विलंब झाला. पुढच्या वर्षी लवकर येण्याची हात जोडून विनंती करीत, भावपूर्ण वातावरणात भक्तांनी लाडक्या गणरायाला रविवारी निरोप दिला. शेवटच्या मूर्तीचे रविवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास विसर्जन झाले.
आगमन ते विसर्जन मोठ्या उत्साहात पार पडले. अनंत चतुर्दशीला शहरात भक्तिमय वातावरण होते. विसर्जन मार्गावर दुतर्फा गणेशभक्तांनी मोठी गर्दी केली होती. राज्याच्या विविध भागांतून तसेच कर्नाटकातूनही भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मिरजेतील बहुताीं सार्वजनिक गणरायाचे विसर्जन मिरजेतील ऐतिहासिक गणेश तलावात झाले. विसर्जनासाठी महापालिकेने चार क्रेनची व्यवस्था केली होती. शनिवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास मिरवणुकीस सुरुवात झाली. मिरवणुकीतील गर्दी मात्र सायंकाळी पाच वाजल्यानंतर सुरू झाली. एक एक मंडळ सायंकाळनंतर विसर्जन मार्गावर येत होते. ‘मोरयाऽऽ’च्या जयघोषात येथील आसमंत दुमदुमत होता. लेझीम, झांजपथक, हालगी, ढोल, ताशा, बँड, डीजेद्वारे अनेक मंडळांनी शाही मिरवणुका काढल्या. विसर्जन मार्गावर अनेक सामाजिक संस्थांच्या वतीने पाणी तसेच खाद्यपदार्थ व्यवस्था मोफत केली होती. शनिवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास पवार गल्ली येथील छत्रपती शिवाजी महाराज गणेश मंडळाची मिरवणूक निघाली. रविवारी पहाटे चारच्या सुमारास सुमारे 12 मंडळांच्या मूर्ती गणेश तलावाजवळ आल्या. त्यानंतर मूर्तींचे क्रेनच्या साहाय्याने तलावात विसर्जन करण्यात आले. मिरजेतील धनगरचा राजा संयुक्त गुरुवार पेठ या मंडळाच्या मूर्तीचे रविवारी दुपारी तीन वाजता विसर्जन झाले. या विसर्जनानंतर सांगलीतील धनगरचा राजा मंडळाच्या मूर्तीचे अखेरीस म्हणजे साडेतीन वाजण्याच्या सुमारास विसर्जन झाले.
अखेरीस विसर्जन व्हावे, यासाठी रविवारी दुपारपर्यंत काही मंडळांमध्ये चढाओढ सुरू होती; मात्र उपअधीक्षक प्रणील गिल्डा, निरीक्षक किरण रासकर, मनपा उपायुक्त स्मृती पाटील यांनी उत्तम नियोजन केल्याने विसर्जन व्यवस्थित पार पडले. संयुक्त गुरुवार पेठ मंडळाच्या मूर्तीच्या विसर्जनासाठी सुमारे तीन तासांचा कालावधी लागला. विसर्जन करताना मूर्तीस कोणताही धक्का लागू नये, यासाठी पोलीस प्रशासन व मनपा प्रशासनाने यथोचित खबरदारी घेतली.
रात्रीच्या सुमारास मिरजेतील मार्केट परिसरामध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या कमानीजवळ एकनाथ शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या नावाचे गाणे लावले. यावरून ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेत त्यास मज्जाव केला. यावेळी दोन्ही गटांमध्ये जोरदार वादावादीदेखील झाली. काही काळ तणाव निर्माण झाला होता; मात्र नंतर तो निवळला.