

तासगाव : मुंबई येथील अल्पवयीन मुलीवर तिच्या राहत्या घरी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवून अत्याचार केल्याप्रकरणी एकावर पोक्सोनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलगी व संशयित सुटीसाठी तासगाव तालुक्यातील नातेवाईकांकडे आल्यानंतर हा प्रकार घडला. याप्रकरणी पीडित शाळकरी मुलीने तासगाव पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. विकास बनसोडे (रा. शांती पार्क, न्यू म्हाडा, मीरा रोड, ठाणे) असे संशयिताचे नाव आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, पीडित अल्पवयीन शाळकरी मुलगी ही 15 वर्षे दहा महिन्यांची आहे. ती दहावीत शिकत आहे. संशयित व पीडित शाळकरी मुलगी उन्हाळ्याच्या सुटीत तासगाव तालुक्यात नातेवाईकांच्या घरी आले होते. यादरम्यान संशयिताने दि. 13 मेरोजी रात्री नातेवाईकांच्या घरी तसेच 25 मेरोजी मुंबईतील चुनाभट्टी परिसरातील पीडित मुलीच्या राहत्या घरी अत्याचार केला.
दरम्यान, मुलीला त्रास होऊ लागल्याने कुटुंबियांनी तिला रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय तपासणी केली असता पीडित मुलगी 15 आठवड्यांची गर्भवती असल्याचे उघडकीस आले. याबाबतची माहिती पीडित मुलीच्या कुटुंबियांना देण्यात आली. यानंतर पीडित मुलीने संशयित विकास बनसोडे याच्याविरोधात फिर्याद दिली. त्याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 64 (2) (1), 65(1) तसेच पोक्सो कायदा 2012 चे कलम 4, 6, 8, 10 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक अविनाश घोरपडे करत आहेत.