जत : बाज (ता. जत) येथे एका अल्पवयीन मुलीचा विवाह लावून दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी जत पोलिस ठाण्यात आठ जणांविरोधात बालविवाह प्रतिबंधक कायदा, पोक्सो कायदा तसेच भारतीय न्याय संहितेअंतर्गत गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत कागल पोलिस ठाण्याच्या उपनिरीक्षक सुप्रिया भिसे यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी अल्पवयीन असल्याची पूर्ण कल्पना असतानाही सप्टेंबर 2022 मध्ये बाज (ता. जत) येथे तिचा विवाह लावून देण्यात आला होता. विवाहानंतर काही दिवसांतच पीडित मुलगी अल्पवयातच गर्भवती राहिल्याचे समोर आले. हा गंभीर प्रकार उघडकीस आल्यानंतर सुरुवातीला कोल्हापूर जिल्ह्यातील कागल पोलिस ठाण्यात झिरो एफआयआरअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, गुन्ह्याची मूळ घटना जत पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने हा गुन्हा पुढील कायदेशीर तपासासाठी जत पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.
या प्रकरणी संशयित आरोपी अजय जावीर (वय 18), सुशीला जावीर, गुलाब जावीर, मच्छिंद्र जावीर (सर्व रा. बाज, ता. जत, जि. सांगली) तसेच माया ऐवळे, अशोक ऐवळे, माधुरी ऐवळे आणि प्रेम ऐवळे (सर्व रा. सासणे मळा, तामगाव, ता. करवीर, जि. कोल्हापूर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी या सर्व संशयितांवर गुन्ह्याची नोंद केली आहे. जत पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.