

सांगली : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचारप्रकरणी चंद्रकांत मधुकर लोंढे (वय 26, रा. सोनी, ता. मिरज) याला दहा वर्षे सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. दंडाची रक्कम पीडित मुलीला देण्याचे आदेश विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश जे. ए. मोहंती यांनी दिले आहे.
सरकार पक्षातर्फे आरती देशपांडे-साठविलकर यांनी काम पाहिले. खटल्याची हकीकत अशी, चंद्रकांत लोंढे याची व पीडित मुलीची ओळख होती. चार वर्षांपूर्वी 2021 मध्ये त्याने पीडितेला मोबाइलवरून मेसेज करून मध्यरात्रीनंतर घराबाहेर बोलावले. त्यानंतर मिरज तालुक्यातील एका गावातील शेतात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. सकाळी पीडित मुलगी घरात दिसत नसल्यामुळे तिच्या आईने मिरज ग्रामीण पोलिस ठाणे गाठले. त्याचवेळी पीडित मुलीस संशयित चंद्रकांत याच्या चुलत्याने घरी आणून सोडले. यानंतर पीडितेचा भाऊ तिला घेऊन पोलिस ठाण्याला गेला.
तेथे पीडित मुलीने घडलेली हकीकत पोलिसांना सांगितली. त्यानंतर पोलिसांनी चंद्रकांत याच्याविरुद्ध अपहरण व पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला. महिला सहायक पोलिस निरीक्षक पी. सी. बाबर यांनी तपास करून दोषाआरोपपत्र दाखल केले. खटल्यामध्ये सरकार पक्षातर्फे एकूण 12 साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये पीडिता आणि तिची आई यांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. सरकार पक्षाला मिरज ग्रामीण पोलिस ठाण्याचे श्यामकुमार साळुंखे, पैरवी कक्षातील रेखा खोत, सुनीता आवळे, वंदना मिसाळ यांनी मदत केली.