

विटा : येत्या दोन वर्षात श्रीक्षेत्र रेवणसिद्ध मंदिरासाठी 5 कोटींचा निधी देणार, तसेच बाणूरगड आणि भाळवणी या ऐतिहासिक गावांनाही मोठा निधी देऊ, अशी ग्वाही ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आळसंद (ता. खानापूर) येथे भाजप कार्यकर्ता संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे प्रमुख पाहुणे, तर आमदार गोपीचंद पडळकर, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, माजी समाजकल्याण सभापती ब्रम्हानंद पडळकर, जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, जयवंत सरगर, तालुकाध्यक्ष दाजी पवार, दादासाहेब हुबाले प्रमुख उपस्थित होते.
यावेळी सागर सोनवले यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. ना. गोरे म्हणाले, प्रस्थापितांना विरोध करूनच आमदार पडळकरांचे नेतृत्व उभे राहिले. खानापूर मतदारसंघात ब्रह्मानंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली चांगले संघटन उभारत आहे. येत्या साडेचार वर्षांत आपला पक्ष या मतदारसंघात परिवर्तन करण्यासाठी ताकदीने उभा राहील. आज आमदार पडळकर यांच्या माध्यमातून छत्र निजामपूरचे रायगडवाडी असे नामकरण करण्याचा ऐतिहासिक निर्णय झाला. खानापूर तालुक्यातील बहिर्जी नाईकांचे बाणूरगड आणि संताजी घोरपडे यांचे भाळवणी ही आमची शक्तिस्थळे आहेत. या दोघांची स्मारके तेथे उभारणे हे आपले नैतिक कर्तव्य आहे. आमदार पडळकर जे मागतील, ते देण्यासाठी आपण कटिबद्ध आहे. सर्वसामान्य लोकांसाठी काम करणारे हे नेतृत्व आपण जपले पाहिजे, मोठे केले पाहिजे, असेही मंत्री गोरे यांनी सांगितले.
आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले, कसलाही वारसा नसणार्या मंडळींना आज फडणवीस यांनी संधी दिली. हे फक्त भाजपाच करू शकते. आपल्या पक्षात कार्यकर्ताच मालक असतो. मुख्यमंत्री फडणवीस यांनीच सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांचा दुष्काळ हटविला आहे. मंत्री गोरे यांनी त्यांच्या खात्यामार्फत गरिबांच्या लग्नासाठी पाच-दहा हजारात मंगल कार्यालय उपलब्ध करून देण्याची योजना आणावी. नुसते छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन चालत नाही, तर त्या विचारावर काम करावे लागते. लोकभावनेचा आदर करणारे आपले नेतृत्व आहे. छत्र निजामपूरचे नामकरण करून त्यांनी रायगडवाडी असे केले. इस्लामपूरचे ईश्वरपूर करण्यात आले. पण कोणी तरी त्याला विरोध करत आहे. बाणूरगडला बहिर्जींचे, तर भाळवणीला संताजी घोरपडे यांचे स्मारक उभे करा, तसेच खानापूर आणि सुलतानगादे या गावांचेही नामकरण करू. या ठिकाणी खान, सुलतान असे काही चालणार नाही, असेही आमदार पडळकर यांनी सांगितले.
माजी मंत्री सदाभाऊ खोत म्हणाले, आम्हाला म्हणतात सत्तेचा माज आला आहे. पण 50 वर्षे तुम्हाला सत्तेचा माज होता, तो उतरविण्याचे काम आ. पडळकरांनी केले. हा इतिहास लिहिला जाईल. नेत्यासाठी जीव ओवाळून टाकणारे कार्यकर्ते आहेत, त्यासाठी मला त्यांचे कौतुक करायचे आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, जि. प.चे माजी समाजकल्याण सभापती ब्रम्हानंद पडळकर यांचीही भाषणे झाली. यावेळी जयवंत सरगर, तालुकाध्यक्ष दाजी पवार, दादासाहेब हुबाले, संग्राम माने, सुशांत पवार, नीलेश पाटील, प्रमोद भारते, माणिक शिंदे, मयुरेश गुळवणी, उदय नलवडे, संतोष यादव उपस्थित होते.