

जत; पुढारी वृत्तसेवा : समता आश्रम शाळेतील दिलेल्या जेवणातून १६९ विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे. रुग्णालयात भेट दिली असता सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आहे. विद्यार्थी पूर्ण बरे झाल्याशिवाय त्यांना डिस्चार्ज दिला जाणार नाही. त्यांच्या उपचाराची जबाबदारी सर्वस्वी शासनाची आहे. तसेच या गंभीर प्रकरणाची सखोल माहिती समाज कल्याण विभाग घेत आहे. चौकशीअंती संबंधितावर कारवाई केली जाईल. यासाठी जिल्हाधिकारी व समाजकल्याण आयुक्त यांना आदेश दिले आहेत, अशी माहिती राज्याचे गृहनिर्माण व सहकार आणि इतर मागास आणि बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी दिली.
उमदी (ता. जत) येथील समता आश्रम शाळेत १६९ मुलांना अन्नातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना घडली. त्यांच्यावर माडग्याळ, जत, कवठेमहांकाळ व मिरज येथे उपचार सुरु आहेत. या घटनेनतर मंत्री सावे यांनी जत ग्रामीण रुग्णालय येथे उपचार सुरु असलेल्या मुलांशी संवाद साधला. त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. शिवाय, आरोग्य विभागाला उपचारासाठी योग्य त्या सूचना केल्या आहेत. याप्रसंगी बोलत होते. यावेळी जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, माजी आ. विलासराव जगताप, जिल्हा बँकेचे संचालक प्रकाशराव जमदाडे, जिल्हा आरोग्य अधिकारी, समाजकल्याणचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सावे म्हणाले, मी सर्व मुलांना भेटून त्यांची चौकशी केली आहे.विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या १६९ इतकी आसुन यात ५४ मुली व ११५ मुलांचा समावेश आहे.सद्या सर्व विद्यार्थ्यांची तब्येत स्थिर असून माडग्याळ, जत, कवठेमहांकाळ व मिरज येथे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. सरकार म्हणून त्यांची पूर्णपणे काळजी आम्ही घेत आहोत. त्यांना कशाचीही कमतरता भासणार नाही. अन्न व औषध प्रशासनाकडून (आश्रम शाळेने दिलेले जेवणाचे नमुने) घेतलेले आहेत. यासंदर्भात लवकरच अहवाल प्राप्त होईल. यानंतर संस्था चालक, मुख्याध्यापक व अधीक्षक यांच्या कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
दरम्यान, 115 मुले व 54 मुली यांची प्रकृती स्थिर असून त्यांना योग्यतो औषधोपचार सुरु आहे. लवकरच त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात येईल. असेही मंत्री सावे यांनी स्पष्ट केले.