

सांगली ः जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. 2011 ची जिल्हा परिषद व पंचायत समिती क्षेत्रातील ग्रामीण लोकसंख्या विचारात घेऊन गट आणि गणांची निश्चित केली जाणार आहे. त्यानुसार आपापल्या भागातील लोकसंख्येची माहिती देण्याचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सर्व तहसीलदारांना देण्यात आले आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसात मिनी मंत्रालय आणि पंचायत समित्यांची रणधुमाळी सुरू होण्याची शक्यता आहे.
गेल्या तीन वर्षांपासून रखडलेल्या निवडणुकीला लवकरच मुहूर्त लागणार आहे. न्यायालयाच्या सूचनेनंतर निवडणुका घेण्यासाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. गेल्या महिन्यात ग्रामविकास विभागाच्यावतीने निवडणुकीसंदर्भात बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांची सदस्यसंख्या निश्चित करण्यासाठी लोकसंख्येची माहिती तातडीने देण्याची सूचना देण्यात आली होती. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने याबाबत हालचाली सुरू केल्या आहेत. लोकसंख्येची माहिती देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
गेल्या पाच ते आठ वर्षांमध्ये काही ग्रामपंचायती शहरी भागात समाविष्ट झाल्या आहेत. काही गावांचे तालुके बदलले आहेत. काही ग्रामपंचायतींची नगरपंचायत झाली आहे. त्यामुळे लोकसंख्येच्या सद्यस्थितीची माहिती मागविण्यात आली आहे. जिल्हा परिषद सदस्यसंख्या कमीत कमी 50 आणि जास्तीत जास्त 75 निश्चित करण्याची सूचना आहे. त्यानुसार प्रभाग रचना निश्चित करण्यात येणार आहे. प्रभाग रचनेच्या नकाशासह इतर माहिती तयार करून कार्यालयास दि. 11 जूनपर्यंत सादर करा, असे आदेश तहसीलदारांना देण्यात आले आहेत. त्यानुसार तालुकानिहाय माहिती गोळा करण्याची कार्यवाही सुरू झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. प्रशासकीय पातळीवर त्यासाठी हालचाली गतिमान झाल्या आहेत. त्यामुळे लवकरच जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू होणार आहे.
जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांची निवडणूक होण्याचे संकेत मिळत असल्याने दुसर्या फ ळीतील इच्छुक तयारीला लागले आहेत. निवडणुकीच्या मैदानात उतरण्यासाठी प्रदर्शनही सुरू झाले आहे. यंदा काहीही झाले तरी मैदानात उतरणारच, अशी भूमिका काहींनी घेतली आहे. त्यामुळे इच्छुकांची डोकेदुखी वाढणार आहे. नेतेमंडळींकडून चाचपणी सुरू झाली आहे. येत्या काही दिवसांत ग्रामीण भागातील राजकीय वातावरण तापणार आहे. निवडणूक जिंकण्यासाठी नेतेमंडळी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी संपर्क वाढवला आहे. बहुसंख्य सर्वच राजकीय पक्षांकडून छोट्या-मोठ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.
2017 मध्ये झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत 60 जागा होत्या. त्यामध्ये सर्वसाधारण गटासाठी 37, ओबीसी प्रवर्गासाठी 16 आणि अनुसूचित जाती प्रवर्गाच्या 7 जागांचा समावेश होता. मात्र दोन वर्षांपूर्वी नव्याने गटांची रचना करण्यात आली. त्यानुसार गटांची संख्या 68 झाली होती. आरक्षण सोडतही काढण्यात आली होती, पण त्याला स्थगिती देण्यात आली. मात्र पुन्हा नव्याने गटांची रचना करून सोडत काढण्यात येणार असल्याची माहिती आहे. मात्र आता गटसंख्या 60 राहणार की 68 आणि गण 120 की 136, याबाबत तर्कवितर्क व्यक्त होत आहेत. मात्र पंधरा ते वीस दिवसांमध्ये याबाबतचे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.