ऐतवडे खुर्द ः दुधाचा उत्पादन खर्च वाढत असताना दर मात्र कमी होत आहे. आता गाईच्या दूधदरात कपात झाल्याने दूध उत्पादक अडचणीत आला आहे. अनुदानही बंद झाल्याने दूध व्यवसाय तोट्यात जाऊ लागला आहे. अनेक युवक आता दूध व्यवसायापेक्षा एमआयडीसीत, शहरात रोजगार शोधू लागले आहेत.
भागातील अनेक तरुण आता नोकरीपेक्षा मुक्त गोठा, बंदिस्त गोठा करून दुग्ध व्यवसायात उतरले आहेत. लाखो रुपयांचे कर्ज काढून तरुणांनी त्यामध्ये गुंतवणूक केली आहे. गेल्यावर्षीपासून दुधाचे दर वाढलेले नाहीत. म्हशीच्या दुधाला 6 फॅटला 50 रुपये प्रतिलिटर व गाईच्या 3 फॅटच्या दुधाला 30 रुपये प्रतिलिटर दर मिळत आहे. बाजारात 1 लिटर पाण्याची बाटली 20 रुपयांना मिळत असताना, गाईच्या दुधाचा दर 30 रुपये मिळत असेल, तर ही दूध उत्पादकांची चेष्टा नव्हे काय, असा सवाल केला जात आहे. आता तर गाय दूध दरात कपात करण्यात आली आहे. शासनाने दुधाचे अनुदान बंद केल्याने दूध व्यवसाय आतबट्ट्यात आला आहे.
आता तर पशुखाद्याच्या दरात प्रचंड वाढ झाली आहे. सरकी पेंड (40 किलो) 1600 रुपये, गोळी (50 किलो) 1700 रु., गहू भुसा (50 किलो) 1200 रुपयांपर्यंत, अशा पशुखाद्याच्या किमती वाढल्या आहेत. ओला चारा, कडबा आदी विकत घेणेही मुश्कील झाले आहे. दोन वर्षांत लम्पी साथीने धुमाकूळ घातला आहे. या साथीत अनेक जनावरे दगावली. जी वाचली, त्यांची दूध देण्याची क्षमता कमी झाली. याचा फटका असंख्य पशुपालकांना बसला. ते आता कर्जबाजारी झाले आहेत. महागाईच्या भडकत्या वणव्यात गाईच्या दुधाला किमान 50 रुपये लिटर, तर म्हशीच्या दुधाला 100 रुपये लिटर दर मिळणे आवश्यक आहे, तशी मागणीदेखील होत आहे.