

विटा : विटा-सांगली रस्त्यालगत असलेल्या मायाक्कानगर परिसरात एका बांधकामावर फरशी बसवण्याचे काम करणाऱ्या दोन परप्रांतीय कामगारांमध्ये झालेल्या वादातून हत्येची धक्कादायक घटना घडली आहे. दुपारी झोपेत असलेल्या साथीदाराच्या डोक्यात भरीव लाकडी दांडक्याने मारहाण करून एकाने त्याचा निर्घृण खून केला. ही घटना बुधवारी (दि.२९) दुपारी दोनच्या सुमारास घडली. राजमन राजाराम कुमार (वय २८, सिध्दार्थनगर, उत्तरप्रदेश) असे मृत कामगारांचे तर अशोक कुमार (वय २६) असे संशयिताचे नांव आहे. त्याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.
मायाक्कानगरमधील जमीन गट नंबर ८३९ मध्ये दयानंद साबळे यांच्या नवीन इमारतीचे बांधकाम सुरू आहे. या ठिकाणी उत्तर प्रदेशातील चार तरुण फरशी बसवण्याचे काम करत असून ते त्याच बांधकामाच्या एका खोलीत राहत होते. बुधवारी फरशी बसवण्याचे काम बंद होते. दुपारच्या सुमारास राजमन आणि अशोक कुमार यांच्यात कोणत्या तरी कारणावरून जोरदार वादावादी झाली. वादानंतर राजमन हा इमारतीतील एका खोलीत झोपण्यासाठी निघून गेला. राजमन झोपेत असताना, दुपारी दोनच्या सुमारास अशोक कुमारने राग मनात धरून त्याच्या डोक्यात भरीव लाकडी दांडक्याने जोरदार वार केले. डोक्यावर दोन ठिकाणी गंभीर घाव बसल्याने राजमन रक्ताच्या थारोळ्यात पडला.
हल्ला केल्यानंतर संशयित अशोक कुमार घटनास्थळावरून पळून गेला. मारहाणीचा आवाज व गोंधळ ऐकून परिसरातील रहिवाशांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी झालेल्या राजमनला लागलीच जवळच्या विटा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी सदाशिव शेलार, पोलिस निरीक्षक धनंजय फडतरे, पोलिस उपनिरीक्षक अभिजीत कणसे, संग्राम पाटील आणि पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. तपासासाठी फॉरेन्सिक पथकाला पाचारण करण्यात आले होते. पथकाने घटनास्थळावरून रक्ताचे नमुने, रक्ताने माखलेली चादर आणि गुन्ह्यात वापरलेले लाकडी दांडके जप्त केले आहे.