

मिरज : मध्यरात्री 2 च्या सुमारास सुसाट वेगाने धावणारी स्पेशल रेल्वे... रेल्वेवर दरोडा टाकण्यासाठी दरोडेखोरांनी सिग्नल वायर कापली... हा प्रकार लक्षात येताच रेल्वेबाबत घातपाताच्या शक्यतेने रेल्वेची यंत्रणा सतर्क झाली... रेल्वेने आपत्कालीन सिग्नल सुरू केला... पण दरोडा टाकण्यात तरबेज असणाऱ्या दरोडेखोरांनी सिग्नलला शाल गुंडाळली... सिग्नलबाबत संभ्रम निर्माण झाल्याने पायलटने रेल्वे थांबवली... त्यानंतर क्षणार्धात दरोडेखोर रेल्वेत घुसले... दोन महिलांचे मंगळसूत्र आणि एकाचा मोबाईल घेऊन अंधारात पसारही झाले... एखाद्या चित्रपटाला शोभावा, असा थरारक प्रकार कोल्हापूर ते पुणे सह्याद्री विशेष रेल्वेत शनिवारी मध्यरात्री घडला.
सह्याद्री एक्स्प्रेस कोरोनापासून कोल्हापूर ते पुणे विशेष एक्स्प्रेस नावाने धावत आहे. ही रेल्वे शुक्रवारी रात्री 10 वाजून 50 मिनिटांनी कोल्हापूर रेल्वे स्थानकातून तिच्या निर्धारित वेळेत रवाना झाली. दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी मध्यरात्री 12 वाजून 4 मिनिटांनी ती मिरजेत दाखल झाली. त्यानंतर पुण्याकडे रवाना होण्यासाठी निघाली. मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास ही रेल्वे शेणोली स्थानकातून कराडकडे जाणार होती. याचवेळी या रेल्वेवर दरोडा टाकण्यासाठी दबा धरून बसलेल्या दरोडेखोरांनी सिग्नल यंत्रणेमध्ये बिघाड घडवत डाव साधला. त्यांनी चाकूच्या साहाय्याने सिग्नल वायरच कापली.
सिग्नल यंत्रणेतील बिघाड रेल्वेच्या यंत्रणेच्या तत्काळ लक्षात आला. त्यामुळे रेल्वेने आपली आपत्कालीन सिग्नल यंत्रणा कार्यान्वित केली. परंतु सराईत दरोडेखोरही चाणाक्ष निघाले. त्यांनीही ही बाब हेरली. सोबत आणलेली शाल त्यांनी सिग्नललाच गुंडाळली. परिणामी सिग्नलच दिसत नसल्याने सह्याद्री एक्स्प्रेसचा पायलटही संभ्रमित झाला.
रेल्वे स्थानकाशिवाय विशेष रेल्वे थांबल्याने प्रवासी गोंधळले. एवढ्यात दबा धरून बसलेल्या दरोडेखोरांनी उघड्या दिसतील त्या खिडक्यांमध्ये हात घालण्यास सुरुवात केली. दिसेल त्या महिलेचे दागिने हिसडा मारून तोडण्यास सुरुवात केली. यामुळे रेल्वेत एकच गोंधळ उडून आरडा-ओरडा सुरू झाला. त्यामुळे प्रवाशांनी उघड्या खिडक्या बंद करण्यास सुरुवात केली. दरोडेखोरांनी दोन महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्राला हिसडा मारला. एका प्रवाशाचा मोबाईल चोरला. प्रवाशांचा आरडा-ओरडा ऐकून दरोडेखोरांनी रेल्वेमार्गालगत असणाऱ्या रस्त्यावरून धूम ठोकली.
दरम्यान, दरोडा पडल्याची माहिती कराड रेल्वे स्थानकातील स्टेशन मास्तरना मिळाली. त्यांनी तातडीने पायलटला रेल्वे पुढे मार्गस्थ करण्याची सूचना दिली. रेल्वे कराड स्थानकात आणण्यात आली. त्यानंतर पुढे पुण्याकडे रवाना करण्यात आली. तातडीने याची माहिती मिरज रेल्वे पोलिसांना देण्यात आली. आता या दरोडेखोरांचा शोध सुरू करण्यात आला आहे.