

म्हैसाळ : मिरजपूर्व भाग व कवठेमहांकाळ तालुक्याच्या दुष्काळी भागाला संजीवनी ठरणाऱ्या म्हैसाळ उपसा जलसिंचन योजनेच्या आवर्तनाला नुकतीच सुरुवात झाली आहे. त्यामुळे या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या शेतीच्या पाण्याची टंचाई आता दूर होणार आहे.
निसर्गाच्या बदलत्या वातावरणानुसार शेतातील पिकांना पाणीटंचाई भासू लागली होती. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी व भाजप व विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दूष्काळी भागाला म्हैसाळ योजनेतून पाणी सोडावे अशी मागणी केली होती. त्या पार्श्वभूमीवर शनिवारी मिरजपूर्व भाग व पुढील भागासाठी पाणी सोडण्यात आले. त्यामुळे मिरजपूर्व भागातील शेतीला लागणारे पाणी येत असल्यामुळे शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे.
सध्या रब्बी हंगाम असल्याने या भागातील पिके चांगली आलेली आहेत. त्यामुळे त्यांना पाण्याची कमतरता भासू नये म्हणून म्हैसाळ योजनेच्या पाण्याची गरज होती. त्याप्रमाणे या योजनेतून पाणी सुरू केले आहे. त्यामुळे जनावरांना व शेतीच्या पाण्याची सोय झाल्याने शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे. यासंदर्भात म्हैसाळ जलसिंचन योजनेचे कार्यकारी अभियंता रोहित कोरे यांनी सांगितले की, सध्या रब्बी संगम सुरू आहे. पिकांना पाण्याची गरज भासू लागली आहे. म्हणून आम्ही फेब्रुवारीपर्यंत पाणी देण्यासाठी प्रयत्न करत आहोत. तशी शासनाने मान्यताही दिली आहे. शेतकऱ्यांच्या पाणी प्रश्नाचा व त्यांच्या हिताचा विचार करून या रब्बी हंगामाकरिता हे पाणी सोडण्यात येत आहे.
भविष्यात शेतकऱ्यांनी शेतीसाठी पाण्याची मागणी करावी. पाणी मागणी अर्ज भरावेत व आमच्या विभागाशी संपर्क साधावा. सध्या, टप्पा क्रमांक एकमधील दोन पंप व म्हैसाळ टप्पा क्रमांक दोनमधील तीन पंप चालू करण्यात येत आहेत. जशी शेतकऱ्यांची मागणी वाढेल व शासनाची मान्यता मिळेल, त्या त्या वेळी हे पाणी सोडण्यासाठी आमचे प्रयत्न राहतील. या योजनेवरील किरकोळ बदल व किरकोळ कामे राहिली असतील तर ती आम्ही लवकरच पूर्ण करत आहोत. भविष्यात परिस्थिती बदलेल तसे आम्ही ज्यादा पंप चालू करण्याचा विचार करू. पण, शेतकऱ्यांना पाण्यापासून वंचित ठेवणार नाही. फक्त शेतकऱ्यांनी पाणी मागणी अर्ज करून विभागाला सहकार्य करावे.