

भौगोलिकदृष्ट्या विस्ताराने सर्वात मोठा तालुका, आवर्षणग्रस्त तालुका, मानव निर्देशांक कमी, ऊसतोड मजुरांचा तालुका अशी ओळख बनलेल्या तालुक्याने मूळ म्हैसाळ योजनेचे पाणी शिवारात आल्याने कृषी क्षेत्राने कात टाकली आहे. परंतु तालुक्यातील विस्तारित म्हैसाळ योजनेच्या लाभक्षेत्रातील 65 गावे अद्याप तहानलेलीच आहेत. सध्या विस्तारित म्हैसाळ योजनेची कामे प्रगतिपथावर असून वर्षाखेर अथवा 2026 च्या वर्षारंभाला येळदरीच्या साठवण हौदात पाणी येईल, असे आशादायी चित्र दिसत आहे. विद्यमान आमदार गोपीचंद पडळकर व जलसंपदा विभागाने योजना पूर्णत्वाच्या ईर्षेने कंबर कसली आहे. लाभक्षेत्रातील 65 गावांना ही योजना लाईफलाईन, वरदायी ठरणार आहे.
1995 ला मंजूर असलेली मूळ म्हैसाळ योजना पूर्णत्वास येण्यास 35 वर्षांचा कालावधी लागला. मात्र या तुलनेत विस्तारित म्हैसाळ योजनेस नव्याने 6 टीएमसी पाणी उपलब्ध करणे, प्रस्तावित योजनेस 2 हजार कोटीची प्रशासकीय मान्यता मिळवणे व आर्थिक तरतूद करणे, यांसह लाभक्षेत्रात शीर्षकामे, अन्य कामांसाठी वन विभागाची परवानगी, अंदाजपत्रकीय, प्रशासकीय, सुधारित प्रशासकीय मान्यता, पर्यावरण विभागाची मान्यता, जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाची मान्यता या बाबींची पूर्तता करीत प्रत्यक्षात कामही 60 टक्क्यांपर्यंत प्रगतिपथावर आहे. मूळ म्हैसाळ योजनेच्या तुलनेत विस्तारित योजना सरस आहे. विस्तारित योजनेतील सलगरे, बेळंकी बोगद्याचे काम प्रगतिपथावर आहे. कामे वेळेत व्हावीत, वंचित भागाला पाणी गरजेचे आहे. कृष्णामाई जतच्या शिवारात अवतरेल, या आशेवर बळीराजा आहे.
मूळ म्हैसाळ योजनेवरील 77 गावे वगळता उर्वरित 48 गावे सद्यस्थितीत सिंचनापासून पूर्णपणे वंचित आहेत. 17 गावे अंशत: वंचित आहेत. अशा 65 गावांसाठी स्वतंत्र विस्तारित योजना तयार केली आहे. या गावांना पाणी देण्याबाबत लोकप्रतिनिधी व शेतकर्यांची बर्याच वर्षांपासून मागणी प्रलंबित होती. म्हैसाळ उपसा सिंचन योजनेसाठी अतिरिक्त 6 अ.घ.फू. (टीएमसी) इतक्या पाणी वापरास महाराष्ट्र शासन, जलसंपदा विभागाने दि. 11 ऑगस्ट 2021 रोजी मान्यता दिली आहे. यामुळे मूळ अडसर दूर झाला होता. म्हैसाळ विस्तारित जत उपसा सिंचन योजनेचे नियोजन केले आहे. त्याद्वारे जत तालुक्यातील 26 हजार 500 हे. क्षेत्रास लाभ होणार आहे.