मिरज : शहरातील जुना गांधीनगर रस्त्यावर मतिमंद मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी बाप-लेकाला अटक करण्यात आली आहे. अमोल चाँद पटेल आणि चाँद मीरासाब पटेल (दोघे रा. जुना गांधीनगर रस्ता, मिरज) अशी त्यांची नावे आहेत. याप्रकरणी पीडितेच्या आईने पोलिसात तक्रार दिली आहे.
पीडितेचे आई-वडील हे मजुरीचे काम करतात. त्यामुळे ते दिवसभर घराबाहेर असल्याने पीडिता घरी एकटीच असते. यातील संशयित हे पीडितेचे नातेवाईक असून ते त्यांच्या घराशेजारीच राहण्यास आहेत. दि. २९ रोजी अमोल पटेल हा या मतिमंद मुलीच्या घरात घुसला, त्यानंतर त्याने तिच्यावर अत्याचार केले. तसेच त्याचा वडील चाँद यानेही या मुलीसोबत गैरकृत्य केले. तसेच हा प्रकार कोणास सांगितला तर मारून टाकण्याची धमकी अमोल पटेल याने दिल्याचे पीडितेच्या आईने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत मिरज शहर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.