

मिरज : सुभाषनगर (ता. मिरज) येथे रंगपंचमीनंतर पोहण्यासाठी गेलेल्या डेंटल महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू झाला. क्षितिजकुमार कुंडलिक क्षीरसागर (वय 22, रा. अहिल्यानगर) असे त्याचे नाव आहे. तो भारती डेंटल महाविद्यालयात शेवटच्या वर्षात शिकत होता.
याबाबत माहिती अशी की, रंगपंचमीनिमित्त डेंटल महाविद्यालयाचे पाच ते सहा तरुण सुभाषनगर येथे असणार्या फार्महाऊसवर रंगपंचमी साजरी करण्यासाठी गेले होते. याठिकाणी रंगपंचमी साजरी करून दुपारी 3 वाजता ते शेततळ्यात पोहायला गेले होते. मात्र पोहताना पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. यावेळी सोबत असणार्या विद्यार्थ्यांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचा बुडून मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलिस आणि सांगली स्पेशल रेस्क्यू फोर्सचे पथक घटनास्थळी दाखल झाले. रेस्क्यू फोर्सच्या मदतीने मृतदेह पाण्यातून काढण्यात आला. मिरज शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणी करण्यात आली. याबाबत मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद झाली असून अधिक तपास सुरू आहे.