

सांगली : वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आवश्यक नीट परीक्षा 4 मे 2025 रोजी दिलेल्या विद्यार्थ्यांची वैद्यकीय, दंत वैद्यकीय, आयुष अभ्यासक्रमांसाठीची प्रवेश प्रक्रिया 31 डिसेंबर 2025 रोजी तब्बल सहा महिन्यांनी समाप्त झाली.
14 जून 2025 रोजी नीट परीक्षेचा निकाल घोषित झाला. गतवर्षी नीट परीक्षेत झालेल्या गैरप्रकाराच्या पार्श्वभूमीवर यंदा वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया लवकर आणि सुरळीत पार पडेल अशी अपेक्षा होती. मात्र प्रवेश प्रक्रिया निकालानंतर एक महिना उशिरा सुरू झाली. त्यातच आधी सुरू असलेल्या विविध वैद्यकीय महाविद्यालयांच्या मान्यतेला विलंब झाल्याने तसेच अनेक नवीन वैद्यकीय महाविद्यालयांना उशिरा परवानगी मिळाल्याने प्रवेश प्रक्रिया रेंगाळली.
देशपातळीवरील मेडिकल कौन्सलिंग कमिटीमार्फत पार पडलेल्या वैद्यकीय व दंत वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेच्या पाच फेऱ्या पार पडल्या. महाराष्ट्रात वैद्यकीयच्या पाच, तर दंतवैद्यकीयच्या सहा आणि आयुष कोर्सेसच्या तब्बल आठ फेऱ्या पार पडल्या. तब्बल सहा महिने प्रवेश प्रक्रिया सुरू असल्यामुळे देशपातळीवरील व राज्यपातळीवरील सर्व वैद्यकीय अभ्यासक्रम सुरू होण्यास विलंब झाला. वैद्यकीय प्रवेश प्रकिया इच्छुक सर्वच मुलांच्या पालकांच्या सहनशीलतेचा अंत पाहणारी ठरली.
यंदा राज्यात कोपरगाव आणि अकोला येथे एम.बी.बी.एस.ची नवीन दोन खासगी महाविद्यालये सुरू झाली. 150 जागा वाढल्या तर अश्विनी रुरल मेडिकल कॉलेज ॲन्ड हॉस्पिटल, सोलापूरच्या 50 जागा वाढल्या. यावर्षी बी.ए.एम.एस च्या तब्बल 22 नवीन खासगी महाविद्यालयांना मान्यता देण्यात आली. चौथ्या फेरीत चार आयुर्वेद महाविद्यालये सुरू झाली. माऊली आयुर्वेद कॉलेज, उदगीर या महाविद्यालयाचा समावेश चक्क सातव्या फेरीत, तर नॅशनल आयुर्वेद कॉलेज, सिल्लोडचा समावेश आठव्या फेरीत करण्यात आला.