

सांगली : विटा येथे थाटण्यात आलेला एमडी ड्रग्जचा कारखाना आणि जत तालुक्यातील उमदी येथे झालेल्या तब्बल अडीच कोटींच्या लुटीचा स्थानिक गुन्हे अन्वेषणचे छडा लावला होता. याप्रकरणी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सतीश शिंदे आणि सहायक निरीक्षक नितीन सावंत यांचा सन्मान करण्यात आला.
महाराष्ट्र दिनी पोलिस परेड ग्राऊंडवर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे, प्रभारी पोलिस अधीक्षक रितू खोखर, आयुक्त सत्यम गांधी आणि जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे उपस्थित होत्या. विटा येथील कार्वे एमआयडीसीमध्ये एमडी ड्रग्जचा कारखाना सुरू होता. स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सतीश शिंदे यांच्या पथकाने छापा टाकून या काखान्याचा पर्दाफाश केला होता. यावेळी तब्बल 29 कोटी 73 लाख रुपयांचे 14 किलो 810 ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले होते. तसेच याचे मुंबई आणि गुजरात कनेक्शनदेखील उघड करण्यात पोलिसांना यश आले होते. याप्रकरणी 9 जणांना अटक केली होती.
उमदी येथे एका सराफाची भर रस्त्यात मोटार अडवून लूटमार करण्यात आली होती. परंतु या प्रकरणात केवळ अडीच लाख रुपयांच्या लुटीची फिर्याद देण्यात आली होती. परंतु स्थानिक गुन्हे अन्वेषणकडील सहायक निरीक्षक नितीन सावंत यांनी गोपनीय माहितीच्या आधारे तपास करून कर्नाटकातील विजापूर येथून तब्बल अडीच कोटी रुपयांची रोकड जप्त करून 7 जणांना अटक केली होती. लूटमार झाल्यानंतर अवघ्या 24 तासांत या गुन्ह्याचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाला यश आले होते. याची दखल घेत महाराष्ट्र दिनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते निरीक्षक सतीश शिंदे आणि सहायक निरीक्षक नितीन सावंत यांचा विशेष सत्कार करण्यात आला.