

विटा : हे एमडी ड्रग विट्यातच कसे आले, कसे बनवले गेले आणि कुठे विकले गेले, असा प्रश्न माजी मंत्री आमदार विश्वजीत कदम यांनी थेट विधानसभेत केला.
सांगली जिल्ह्यातील विट्यात मेफेड्रॉन (एम. डी.ड्रग) या अंमली पदार्थ तयार करण्याचा कारखाना जिल्ह्याच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने दोन महिन्यांपूर्वी उध्वस्त केला. आतापर्यंत या प्रकरणी एकूण सात जणांना अटक झाली आहे.मात्र इथल्या सामान्य लोकांमध्ये अद्यापही दहशतीचे वातावरण आहे. विटा आणि परिसरात नशेखोरीचे प्रमाण वाढलेले आहे. अजूनही शहर आणि परिसरात अनेक ठिकाणी गांजा, नशेच्या गोळ्या, इंजेक्शन्स आणि ड्रग्ज घेऊन फिरणारी मंडळी दिसत आहेत. मात्र हा कारखाना नेमका विट्यातच कसा आणि कुणी सुरू केला याबाबतचे गौडबंगाल कायम आहे.
पोलिसांचा तपास अद्यापही सुरू आहे. मात्र राज्य शासनाच्या एमआयडीसी, फूड व ड्रग प्रशासन, स्थानिक प्रशासन यातील अधिकारी वर्गाचे आणि सर्व संबंधितांची बेफिक्री किंवा हलगर्जीपणा यास कारणीभूत आहे. आता विट्यात सापडलेल्या एम डी ड्रग्ज कारखान्याच्या प्रकरणी आता माजी मंत्री आमदार विश्वजीत कदम यांनी विधानसभेत सरकारला प्रश्न विचारत धारेवर धरले आहे. विधानसभेत आमदार कदम म्हणाले, अलीकडच्या काळामध्ये महाराष्ट्र विधान सभेमध्ये वारंवार ड्रग्ज बाबत चर्चा होते. आमच्याकडे मिरजेमध्ये ड्रगचा साठा सापडला सांगली जिल्ह्यातील विट्यामध्ये एमआयडीसीत तर एमडी ड्रग्स बनवायची फॅक्टरीच सापडली. तिथे ३० कोटींचे एम डी ड्रग्ज सापडले. त्याच्यावर पोलिसांनी कारवाई केली परंतू हा कारखाना येथे कसा आला? हे एमडी ड्रग विट्यातच कसे आले, कसे बनवले गेले आणि कुठे विकले गेले, याचा सखोल तपास करावा. संपूर्ण महाराष्ट्रातली नवी पिढी यामुळे धोक्यात आली आहे. याबाबतही गंभीरपणे विचार करण्याची वेळ आली आहे असेही आमदार कदम म्हणाले.