

सांगली : आरक्षण सोडतीनंतर आता महापौरपदाच्या निवडणूक कार्यक्रमाकडे लक्ष लागले आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात महापौर, उपमहापौर निवडणूक शक्य असल्याचा अंदाज पुढे येत आहे.
दरम्यान, महापालिकेची निवडणूक होऊन आठवडा लोटला, तरी अद्याप सत्तास्थापनेचे चित्र अस्पष्ट आहे. सत्तास्थापनेबाबतचा निर्णय मुंबईत होणार असून भाजपचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील बैठकीकडे लक्ष लागले आहे.
महापालिकेची निवडणूक अतिशय चुरशीने झाली. दि. 16 जानेवारी रोजी मतमोजणी झाली. एकूण 78 जागांपैकी भाजपला 39, काँग्रेसला 18, राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाला 16, राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाला 3, तर शिवसेनेला 2 जागा मिळाल्या. भाजप व शिवसेनेने स्वबळावर निवडणूक लढवली. काँग्रेस-राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाने आघाडी केली होती, तर राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाने काँग्रेस-राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाशी अघोषित समझोता करून निवडणूक लढवली होती. निवडणूक निकाल लागून आठवडा झाला, तरी सत्तास्थापनेचे चित्र अजून अस्पष्ट आहे.
महापालिकेत भाजपचे बहुमत एका मताने हुकले आहे. मात्र भाजपने शिवसेनेशी चर्चा केली असून भाजप-शिवसेना युतीचे संकेत भाजप नेते पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत. भाजप-शिवसेना युती झाली तरी, महापालिकेत स्थायी समितीत भाजप-शिवसेनेचे बहुमत होत नाही. त्यामुळे राष्ट्रवादीला सत्तेत सामावून घेण्याशिवाय पर्याय उरला नसल्याचे दिसत आहे. मात्र भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी महायुती होणार अथवा नाही, याबाबत अधिकृत माहिती जाहीरपणे समोर आलेली नाही.
काँग्रेसकडून पाटील, चव्हाण; शिवप्रतिष्ठानच्या पवारही शर्यतीत
महापौर पदासाठी काँग्रेसकडून मयूर पाटील, मंगेश चव्हाण यांचे नाव पुढे येत आहे. भाजपने सत्ता स्थापन केल्यास विरोधी पक्षनेतेपदासाठी फिरोज पठाण यांचे नाव पुढे येत आहे. दरम्यान, महापौर पदासाठी भाजपकडून धीरज सूर्यवंशी, निरंजन आवटी, अतुल माने, रोहिणी पाटील, ॲड. स्वाती शिंदे, तसेच अनिता पवार (शिवप्रतिष्ठान) यांची नावेही इच्छुकांच्या यादीत आहेत.
दरम्यान, दि. 30 ते 31 जानेवारी 2026 या कालावधीत नवनिर्वाचित सदस्यांची बैठक घेऊन महापौर, उपमहापौर निवडण्यात यावेत, असा मजकूर असलेला एक मेसेज समाजमाध्यमावर दुपारनंतर जोरात व्हायरल झाला. मात्र सांगली महापालिकेकडे महापौर, उपमहापौर निवडीचा अधिकृत कार्यक्रम शुक्रवारी रात्रीपर्यंत तरी आला नव्हता. दरम्यान, महापौर व उपमहापौर निवडणूक फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात (दि. 6 फेब्रुवारी) शक्य असल्याचे जाणकारांनी सांगितले. मात्र अधिकृत माहिती मिळू शकली नाही.