

सांगली ः दसर्याच्या पूजेसाठी झेंडूच्या फुलांना मागणी असते. त्यामुळे सांगलीच्या बाजारपेठेत जिल्ह्याच्या विविध भागातून शेतकरी झेंडूची फुले घेऊन बुधवारी सकाळीच दाखल झाले. काही व्यापार्यांनी मंगळवारी रात्रीच घाऊक खरेदी केली होती. सणानिमित्त 110 ते 120 रुपये किलो दराने झेंडूची विक्री सुरू होती. फुलांचे दर वाढल्याने सामान्यांच्या खिशाला कात्री लागत होती, मात्र चांगली विक्री होत असल्याने विके्रत्यांतून समाधानाची भावना व्यक्त होत होती.
दरवर्षी दसर्याला झेंडूच्या फुलांना विशेष मागणी असते. विजयादशमीदिवशी घरांच्या चौकटींना झेंडूच्या फुलांची तोरणे बांधली जातात. वाहनांना हार घातले जातात. पूजेसाठीही फुलांचा वापर केला जातो. येथील बाजारपेठेत रात्री उशिरापर्यंत फुलांची आवक सुरू होती. 30 रुपये पावशेर आणि 110 ते 120 रुपये किलो दराने विक्री सुरू होती. मारुती चौक, कापडपेठ, चांदणी चौक, मुख्य बसस्थानक, गणपती पेठ, रिसाला रोड, राममंदिर चौक, विश्रामबाग चौकासह शहरातील अनेक प्रमुख रस्त्यावर आणि गल्लीबोळातही फु लांचे स्टॉल लागले होते.