

दिघंची : उन्हाळ्याच्या तीव्र झळांनी दिघंची परिसरातील जलस्रोत अक्षरशः कोरडे पडू लागले आहेत. माणगंगा नदी व नदीवरील यादव वस्ती बंधारा कोरडा पडला असून शेतकऱ्यांवर पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे.
दिघंची गावाच्या उत्तर भागात काही ठिकाणी टेंभूचे पाणी अद्याप पोहोचलेले नाही. त्या भागात सध्या भीषण पाणीटंचाई आहे. त्यामुळे टेंभू उपसा सिंचन योजनेचे पाणी सोडावे, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे. मात्र, प्रशासनाकडून अद्याप ठोस नियोजन नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. पिके व फळबागा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना कसरत करावी लागणार आहे.
टेंभू योजनेमधून उन्हाळ्यात पाणी सोडून हा बंधारा भरला जातो. मात्र यंदा अद्याप शेतकऱ्यांनी मागणी केली नसल्याने व पाणीपट्टी भरून पाण्याची मागणी करा, असे आवाहन पाटबंधारे विभागाने केल्याने पाणी पुरवठा रखडल्याचे स्पष्ट होत आहे. परिणामी पिके वाचवण्यासाठी विहिरी, बोअरवेल यांच्या भरवशावर जगण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली. सद्यस्थितीत निंबाळकर तलाव व महाडिकवाडी तलावात काही प्रमाणात पाणी असले तरी, ते पाणी पुरेसे पडणे कठीण होणार आहे.
तीव्र उष्णतेमुळे पाण्याची पातळी खालावत आहे. त्यामुळे केवळ शेतीच नव्हे, तर नागरिक आणि जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर बनण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी वर्गाकडून तातडीने टेंभू योजनेचे पाणी यादव वस्ती बंधाऱ्यात सोडावे, अशी मागणी होत आहे. सध्या दिघंची तलावात टेंभूचे पाणी सोडल्यानंतर ते पाणी ओढ्यातून माणगंगा नदीच्या पात्रातून प्रवाहाने यादव वस्ती बंधाऱ्यात येते. यासाठी बराच वेळ जातो. त्यामुळे टेंभूचे पाणी लवकर सोडावे, अशी मागणी होत आहे.