‘खानापूर’च्या निवडणुकीत ‘माणगंगा’ केंद्रस्थानी

आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी ः जयंत पाटील यांच्या वक्तव्यानंतर कारखाना पुन्हा चर्चेत
Manganga Sugar Factory
माणगंगा साखर कारखाना
Published on
Updated on
विजय लाळे

विटा : गेली 35 वर्षे खानापूर मतदारसंघाची निवडणूक दुष्काळ अन् पाणी या विषयावर गाजत राहिली आहे. यंदा मात्र आटपाडीचा माणगंगा साखर कारखाना चर्चेत आला आहे. या मतदारसंघात प्रबळ दावेदार असलेल्या तीनही नेत्यांमध्ये हा विषय अतिशय संवेदनशीलतेने चर्चिला जात आहे.

हा कारखाना काही वर्षांपासून बंद आहे. नेते बाबासाहेब देशमुख यांनी या कारखान्याची स्थापना केली. मात्र या कारखान्याचा पहिला गळीत हंगाम बाबासाहेब देशमुख पाहू शकले नाहीत. कारखाना सुरू होण्यापूर्वीच त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात त्यांचे ज्येष्ठ पुत्र राजेंद्रअण्णा देशमुख यांनी दुष्काळ आणि प्रतिकूल स्थितीत तब्बल 25-26 वर्षे कारखाना अत्यंत जिद्दीने, निष्ठेने आणि नेटाने चालवला. त्यानंतर केंद्र सरकारची सहकारी कारखानदारीसंदर्भातील धोरणे, सहकारात घुसलेले राजकारण यामुळे राज्यातील इतर काही साखर कारखान्यांचे जे झाले, तेच माणगंगा कारखान्याचे झाले.

देशमुखांचा हा कारखाना सध्या सांगली जिल्हा सहकारी बँकेच्या ताब्यात आहे. अर्थातच कर्ज थकल्याने हा कारखाना बँकेकडे गेलेला आहे. तरीही गेल्यावर्षी या कारखान्याची निवडणूक झाली. निवडणुकीत आपल्याच गटाचे सभासद आपल्याबरोबर नाहीत, ते विरोधकांबरोबर आहेत, हे लक्षात येताच ऐनवेळी राजेंद्रअण्णा देशमुख यांनी सर्व उमेदवार मागे घेतले. यामुळे कारखान्याची सत्ता आमदार अनिल बाबर यांचे समर्थक आणि राजेंद्रअण्णांचे स्थानिक कट्टर विरोधक तानाजी पाटील यांच्याकडे गेली. त्यानंतर काही काळापासून राजेंद्रअण्णा देशमुख यांचे बंधू अमरसिंह देशमुख यांनी माणगंगा कारखाना पुन्हा ताब्यात घेण्याबद्दल आटोकाट प्रयत्न केले, पण त्यात यश आले नाही. या सर्व पार्श्वभूमीवर यंदाच्या निवडणुकीत अमरसिंह देशमुख यांनीच हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आणला.

माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांनी अपक्ष अर्ज भरण्यापूर्वी अमरसिंह देशमुख यांनी आटपाडीमध्ये मेळावा घेत, माणगंगा कारखाना जो आपल्याला मिळवून देईल, त्यांच्यासोबत आपण असू, असे जाहीर विधान केले. इतकेच नव्हे तर त्यासाठी सर्वांबरोबर चर्चा करू, असेही सांगितले. त्यानंतर लगेचच दुसर्‍या दिवशी त्यांनी माजी आमदार सदाशिव पाटील आणि वैभव पाटील यांच्यासमवेत जयंत पाटील आणि तिसर्‍या दिवशी अमोल बाबर यांच्याबरोबर एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. तोपर्यंत राजेंद्रअण्णा देशमुख यांनी खानापूर विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला होता. आटपाडी तालुक्यात प्रत्यक्ष प्रचारालाही सुरुवात केली. या घडामोडी सुरू असताना इकडे खानापूरमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार वैभव पाटील यांच्या प्रचार सभेमध्ये माजी मंत्री जयंत पाटील यांनी आटपाडी कारखान्याचे धुराडे मीच पेटवणार, अशी घोषणा केली. त्यावर अमरसिंह देशमुख यांनी पुन्हा मेळावा घेत, जयंत पाटील यांना दुष्काळी भागातील साखर कारखाने दिसतात, त्यांना सांगलीचा वसंतदादा कारखाना का दिसला नाही? तो पद्धतशीर खासदार विशाल पाटलांच्या झोळीत टाकला. आता आमच्या कारखान्यावर डोळा आहे. राज्याचे नेतृत्व करायला चाललाय. आम्ही तुम्हाला मदत केली, पण तुम्ही आमच्याशी ईर्ष्या का करता? असा सवाल केला. गेल्या वर्षभरात राजारामबापू कारखान्याच्या व्यवस्थापनाने माणगंगा कारखाना ताब्यात घेऊन चालवावा, अशी विनंती खुद्द आपणच केली होती, असा गौप्यस्फोट केला. तसेच माजी आमदार सदाशिव पाटील यांनीच माणगंगा कारखान्याबाबत जयंत पाटील यांना बोलायला लावले, असा आरोपही केला. त्यावर व्यथित होत सदाशिव पाटील यांनी, आपल्यावर जो आरोप झाला, तो क्लेषदायी आहे, गेल्या तीस वर्षाच्या राजकीय कारकीर्दीत आपण कधीही दुसर्‍यांच्या संस्थांमध्ये ढवळाढवळ केली नाही. आपण आपल्या संस्था काढाव्यात, त्या वाढवाव्यात, याच भूमिकेतून काम करीत आलो. त्यामुळे आटपाडीच्या ‘माणगंगा’बाबत हा कारखाना देशमुख कुटुंबीयांच्याच ताब्यात राहिला पाहिजे, अशी भूमिका स्पष्ट केली.

दरम्यान, शिवसेना शिंदे गटाचे नेते अमोल बाबर यांनीही याबाबत आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले, ज्यावेळी आम्ही एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेलो, त्यावेळी त्या दोघांनीही अमरसिंह देशमुख यांना माणगंगा कारखान्याबाबत कशी मदत करता येईल, हे अत्यंत सविस्तरपणे सांगितले होते. त्यानंतर अमरसिंह देशमुख यांचे समाधान झाले, असे आम्हाला वाटत होते. परंतु पुन्हा हा विषय काढून त्यांनी माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांना निवडणुकीत ताकद देण्याचे ठरविलेले दिसते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news