Sangli Crime : सांगलीत खासगी सावकाराकडून एकास जिवे मारण्याची धमकी

सांगली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
Sangli Crime News
सांगलीत खासगी सावकाराकडून एकास जिवे मारण्याची धमकी Pudhari
Published on: 
Updated on: 

सांगली : सावकारी कर्जाची पूर्ण परतफेड केल्यानंतरही आणखी आठ लाखांसाठी तगादा लावत जिवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी बेकायदेशीर सावकार शहाजी शिवकांत पवार (वय ४५, रा. किल्ला भाग, नृसिंह मंदिरजवळ, मिरज) याच्यावर सांगली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत व्यंकटेश प्रशांत खिलारे (२६, रा. गावभाग, सांगली) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गावभागातील व्यंकटेश खिलारे यांनी २७ जानेवारी २०२५ रोजी शहाजी पवार याच्याकडून ऑनलाइन व रोख स्वरूपात १० लाख ३७ हजार रुपये घेतले होते. त्याबदल्यात त्यांनी वेळोवेळी १३ लाख ५५ हजार रुपये परत केले होते. मुद्दल व व्याजाची संपूर्ण परतफेड झालेली असतानाही पवार याने खिलारे यांच्याकडे आणखी ८ लाख रुपयांची बेकायदेशीर मागणी केली.

पैसे देण्यासाठी पवार याने सतत तगादा लावून, पैसे न दिल्यास बहिणीचा संसार उद्ध्वस्त करण्याची धमकी दिली. तसेच, पोलिसांत तक्रार केल्यास ठार मारण्याची धमकी दिली. हा त्रास असह्य झाल्याने अखेर व्यंकटेश खिलारे यांनी सांगली शहर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित शहाजी पवार याच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता (बीएनएस) कलम ३५१ (२), (३) सह महाराष्ट्र सावकारी अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.