

सांगली : गुंतवणुकीवर जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून तब्बल १ कोटी ११ लाख ४८ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी नितीन शंकर यादव, शंकर ज्ञानोबा यादव, अश्विनी ऊर्फ नीशा नितीन यादव (सर्व रा. लाळगे गल्ली, खणभाग, सांगली), पवन ऊर्फ देवगोंडा पाटील (रा. राणाप्रताप चौक, कुपवाड) आणि ब्लू बर्डस् कंपनीविरुद्ध सांगली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत वैभव बाबू साळुंखे (वय ३०, रा. गवळी गल्ली, सांगली) यांनी फिर्याद दिली आहे.
संशयितांनी २०२१ मध्ये रेवा एंटरप्रायझेस, श्री शुभ कॅपिटल, दास एंटरप्रायझेस, श्री शुभ आरंभ, रिचमी ग्रो व ब्लू बर्ड्स या नावांनी कंपन्या स्थापन केल्या होत्या. फिर्यादी वैभव साळुंखे व त्यांच्या मित्रांना फेब्रुवारी २०२१ मध्ये आकर्षक परताव्याचे आमिष दाखवून या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडले.
सुरुवातीला काही काळ जादा परतावा देऊन त्यांनी गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर पूर्वीपेक्षा अधिक परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून एकूण १ कोटी ११ लाख ४८ हजार रुपयांची गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले. डिसेंबर २०२५ पर्यंत आरोपींनी रकमेचा स्वीकार केल्यानंतरही परतावा देणे बंद केले. वारंवार पाठपुरावा करूनही पैसे परत करण्यास टाळाटाळ करण्यात आल्याने आपली फसवणूक झाल्याचे साळुंखे यांच्या लक्षात आले. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी पाचजणांविरुद्ध भारतीय न्यायसंहितेसह (बीएनएस) महाराष्ट्र ठेवीदार हितसंबंध संरक्षण अधिनियमानुसार (एमपीआयडी) गुन्हा दाखल केला आहे.