

जत : जत तालुक्यातील एका गावातील आश्रमशाळेत निवासी चार ते सहा विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे. हा प्रकार लक्षात येताच संबंधित नराधमाला पालकांनी बेदम चोप दिला. याबाबत समाजमाध्यमात चर्चा होताच तो पसार झाला. ही घटना बुधवारी दुपारी घडली.
या घटनेने तालुक्यासह सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. शुक्रवारी दिवसभर इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या सहायक संचालिका धनश्री भांबुरे व उमदी पोलिसांचे पथक शाळेत ठाण मांडून होते. दिवसभर संबंधित शाळेतील शिक्षकांचे बंद खोलीत जबाब घेण्यात आलेे. संस्थेने त्या वादग्रस्त नराधमावर निलंबनाची कारवाई करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र याबाबत पोलिसात तक्रार दाखल?झालेली नाही. शुक्रवारी आमदार गोपीचंद पडळकर यांनी शाळेला भेट दिली. यावेळी पोलिस प्रशासन, बहुजन कल्याण विभाग अधिकारी, संस्था, पालक पदाधिकारी यांची बैठक झाली. बैठकीत सदरची घटना अत्यंत निषेधार्ह आहे, पोलिस व संबंधित विभागास पीडित मुलींची संख्या नेमकी किती आहे, तसेच अजून पाठीमागे जाऊन सखोल चौकशी करण्याची सूचना त्यांनी दिली.
या घटनेनंतर पीडित मुलगी व तिचेे कुटुंबीय गायब असल्याचे सांगितले जात आहे. आ. पडळकर यांनी सुमोटो गुन्हा दाखल करून चौकशी समिती नियुक्त करावी, समितीने तत्काळ अहवाल द्यावा, त्या नराधमाबाबत विद्यार्थिनी, पालक, सामाजिक कार्यकर्ते यांचे जबाब नोंदवून घ्यावेत, अशा प्रवृत्तीच्या व्यक्तींची गय करू नये, असे आदेश दिले.यावेळी पोलिस उपअधीक्षक सचिन थोरबोले, सहायक पोलिस निरीक्षक संदीप कांबळे, बहुजन कल्याण विभागाच्या निरीक्षक भाग्यश्री फडणीस, तहसीलदार प्रवीण धानोरकर, पोलिस उपनिरीक्षक संजीव जाधव, निर्भया पथकाच्या मनीषा नारायणकर, सुनील व्हनखंडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सुनील पवार, सरपंच हिंदुराव शेंडगे, जालिंदर व्हनमाने, डॉ. वैशाली सनमडीकर, डॉ. कैलास सनमडीकर, रवी मानवर, संतोष मोटे, आण्णा भिसे आदी उपस्थित होते.
यावेळी पालक व पदाधिकारी यांनी तक्रारींचा पाढा प्रशासनासमोर मांडला. यातून अधिक चौकशीअंती अनेक धक्कादायक बाबी समोर येणार आहेत. सध्या सात मुलींचे लैंगिक शोषण झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र नेमका अधिकृत आकडा तपासाअंती बाहेर येणार आहे. अन्य शिक्षकांचा सहभाग आहे का? याचीही चौकशी केली जाणार आहे. बुधवारी, संबंधित व्यक्ती मुलींना उन्हाळी सुटी लागल्याने त्यांच्या घरी सोडण्यास गेली होती. त्या ठिकाणी पालक व त्याच्यात वाद झाला. यातून त्याला बेदम मारहाण करण्यात आली. दरम्यान, मध्यस्थी केल्यानंतर त्याला सोडले होते. दुसर्या दिवशी हे प्रकरण मिटविल्याची चर्चा दिवसभर सुरू होती. गुरुवारी सायंकाळी सोशल मीडियावर याबाबतची माहिती तालुक्यात पसरली. त्यानंतर इतर मागास बहुजन कल्याण विभाग खडबडून जागा झाला आहे.
पोलिस अधीक्षक संदीप घुगे म्हणाले, या घटनेची माहिती गुरुवारी रात्रीच मिळाली होती. घटनेचे गांभीर्य ओळखून जतचे उपअधीक्षक, उमदीचे ठाणे प्रभारी अधिकार्यांना तातडीने चौकशीचे आदेश दिले आहेत. पोलिसांचे पथकही संबंधित?शाळेत जाऊन चौकशी करीत आहे. पीडित कुटुंबीयांनी तक्रार दाखल केल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करू. या घटनेवर आपण स्वतः लक्ष ठेवून आहोत.
पीडित दोन विद्यार्थिनींचे शालेय प्रवेश जत येथील एका आश्रमशाळेत असताना, त्यांना वादग्रस्त आश्रमशाळेत ठेवले होते. अत्याचार करणारा नराधम संबंधित मुलींशी सातत्याने लगट करायचा. याबाबत इतर शिक्षकांनी का तक्रार केली नाही? प्रवेश एका शाळेत व शिक्षण दुसर्या शाळेत, ही गंभीर बाब असल्याचे इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या संचालिका धनश्री भांबुरे यांच्यासमोर निदर्शनास आणून दिले. नववी व दहावीच्या वर्गांना मान्यता नसताना विद्यार्थ्यांना प्रवेश कसा दिला जातो, हाही मुद्दा उपस्थित केला.
शाळा व शाळेच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासणीची मागणी पालकांनी केली आहे. यामधून सत्यता समोर येईल. पोलिसांनी डीव्हीआर त्वरित ताब्यात घ्यावा. काही पुरावे मिळतात का हे पाहणे गरजेचे आहे.
या घटनेची नोंद घेत इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या सहायक संचालिक धनश्री भांबुरे, जतचे पोलिस उपअधीक्षक सचिन थोरबोले, सहायक पोलिस निरीक्षक संदीप कांबळे दिवसभर ठाण मांडून होते. या प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती स्थापन केली आहे. समितीचा अहवाल आल्यानंतर सदरची कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.
आश्रमशाळेतून विद्यार्थिनींसंदर्भात लैंगिक अत्याचार झाल्याची माहिती समाजमाध्यमातून समोर आली. संस्थांतर्गत चौकशी करून संबंधितांवर निलंबनाची कारवाई करण्याची परवानगी इतर मागास बहुजन विभागाकडे केली आहे. दोषींवर कारवाई करण्यासाठी कोणत्याही प्रकारची गय केली जाणार नाही, असे संस्थाचालकांनी स्पष्ट केले.
निवासी विद्यार्थिनींवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर संबंधिताचे अनेक कारनामे बाहेर येत आहेत. यापूर्वीही 2017-18 व 2003 दरम्यान संबंधिताचे निलंबन केले होते. मात्र प्रशासनाने चौकशीअंती पुन्हा रुजू करून घेण्यास सांगितले होते. संशयित नराधमाचे आता पुन्हा निलंबन केले आहे. या निलंबनाबाबतचा अहवाल मागास बहुजन कल्याण विभागास सादर केला होता. त्यांच्या मान्यतेनंतर प्रशासनाने निलंबन केले आहे. आश्रमशाळेतील काही निवासी विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी संशयित नराधमावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. याबाबतचा अहवाल मागास बहुजन कल्याण विभागास सादर केला होता. त्यांच्या मान्यतेनंतर प्रशासनाने निलंबनाची कारवाई केली आहे.