

मिरज : मल्लेवाडी (ता. मिरज) येथील मंदिरासह चार घरातील सोने, चांदी आणि रोख रकमेवर चोरट्यांनी डल्ला मारला. मंदिरातील देवाचे सव्वा दोन लाखांच्या दागिन्यांसह अन्य चार ठिकाणी घरफोडी करून तीन लाखांचा मुद्देमाल लंपास केला. एकाच रात्रीत पाच ठिकाणी चोरट्यांनी डल्ला मारल्याने खळबळ उडाली आहे.
मल्लेवाडी येथील एका मंदिरातील पुजारी विशाल क्षीरसागर सोमवारी रात्री बारा वाजता मंदिर बंद करून घरी गेले. मंगळवारी सकाळी मंदिरात पूजेसाठी आल्यानंतर मंदिराच्या दरवाजाची कडी तोडून दरवाजा उघडल्याचे दिसले. आत पाहिल्यानंतर देवाच्या अंगावरील दागिने गायब होते. चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यानी पोलीस पाटील व ग्रामस्थांना ही माहिती दिली.
चोरट्यानी देवाच्या अंगावरील दोन तोळे सोन्याची चेन, दोन सोन्याचे बदाम व अर्धा तोळा सोन्याची पेटी असा ऐवज नेल्याचे निदर्शनास आले. याच रात्री अज्ञात चोरट्यानी चार ते पाच घरे फोडल्याचे लक्षात आले यामध्ये भास्कर क्षीरसागर यांच्या गोट्यातील एक शेळी, प्रदीप भोसले यांचे घर फोडून 50 हजार रुपये रोख रक्कम, पिंटू मल्हारी शिंदे यांच्या घरातील साडेतीन ग्रॅम सोने व एक तोळा चांदी व वीस हजार रुपये रोख रक्कम चोरट्याने चोरून नेली. याबाबत मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद आहे.