

ऐतवडे बुद्रुक : संततधार पावसाने वारणा टापूतील विहीर बागायत गावांतील ३० हून अधिक बंधारे तुडुंब भरले आहेत. त्यामुळे येणाऱ्या रब्बी पिकांना हे बंधारे आता आधार वाटू लागले आहेत.
वाळवा तालुक्यातील सधन पट्ट्यातील समावेश असणाऱ्या, पण विहीर बागायतीवर कार्वे, ढगेवाडी, जक्राईवाडी, ऐतवडे बुद्रुक, शेखरवाडी आदी गावे अवलंबून आहेत. रब्बी पिकांच्या पाण्यासाठी, पशुधनासाठी पर्याय ठरलेले तलाव व बंधारे हे या गावांसाठी वर्षभर आधार ठरतात. तुडुंब भरलेल्या बंधार्यांमुळे परिसरातील विहिरींच्या भूजल पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सन १९७२ मधील भीषण दुष्काळाची २००२ मध्ये पुनरावृत्ती झाली. ढगेवाडी, कार्वे, जक्राईवाडी येथील डोंगर-दऱ्यातून, नाल्यातून पाणी वाहून जात होते. मात्र तलाव बांधल्यानंतर पाण्याचा मोठा साठा होत आहे. यावर्षी भकास दिसणारा हा परिसर संततधार पावसामुळे हिरवाईने नटला असून बंधारेही पावसाच्या पाण्याने पूर्ण क्षमतेने भरले आहेत.
ढगेवाडी, कार्वे तलाव बांधल्यापासून पिण्याचा, पशुधन, शेतीचा पाणीप्रश्न काहीअंशी संपुष्टात आला. या तलावांखालील गावांतील ओढ्या-ओघळीवर सुमारे ३० बंधारे आहेत. बंधाऱ्यांमुळे परिसरातील विहिरींच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.
पाणीप्रश्नावर पुनर्भरण हाच उपाय असल्याने महसूल प्रशासनाने जलयुक्त गाव अभियानाचा गेल्या सहा-सात वर्षांपासून धडक कार्यक्रम राबविला. मंडलनिहाय पालक अधिकारी नियुक्त केले. ओढ्या, ओघळीवर कृषी विभाग, जिल्हा परिषद, जलसंधारण विभाग, छोटे पाटबंधारे विभाग यांच्यासह अनेक विभागांच्या माध्यमातून बंधाऱ्यांसाठी निधी मिळाला. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. अजूनही जास्तीत जास्त सिमेंट बंधारे बांधण्यासाठी प्रयत्न करावा, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.