

तासगाव : ग्रामीण भागाच्या विकासासाठी सरपंचांना बळ देणे गरजेचे आहे. सर्व समस्या सोडविण्यासाठी महायुतीचे सरकार सरपंचांना राजाश्रय देऊन सक्षम करेल, असे आश्वासन उद्योग व मराठी भाषामंत्री उदय सामंत यांनी दिले.
सरपंच व प्रशासन यांच्यामध्ये संवाद घडवून आणण्यासाठी अखिल भारतीय सरपंच परिषदेच्यावतीने तासगाव येथे जिल्हास्तरीय सरपंच संवाद मेळावा झाला. मेळाव्याचे उद्घाटन मंत्री उदय सामंत यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे, मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल ओसवाल, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत शिंदे यांच्यासह सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
सामंत म्हणाले, सरपंच हा गावाचा मुख्यमंत्री आहे. त्यांनी स्वत:ला कमी लेखू नये. जे सरपंच करू शकतो, ते मंत्र्याला देखील शक्य नाही. गाव तंटामुक्त राहण्यासाठी सरपंचांचे योगदान मोठे असते. महाराष्ट्रात महिला सरपंचांची संख्या मोठी आहे. पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य या पदांवर देखील महिलांची संख्या मोठी आहे. मात्र घरातल्या पुरुषांनी महिलांच्या कामामध्ये हस्तक्षेप न करता महिलांना काम करू दिले पाहिजे. ग्रामसेवक आणि सरपंच यांनी एकत्र काम केल्यास गावाचा विकास होऊ शकतो.
सरपंच परिषदेचे राज्य संघटक अरुण खरमाटे यांनी स्वागत केले. आर. डी. पाटील यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा संदेश वाचून दाखविला. परिषदेचे संस्थापक जयंत पाटील-कुर्डूकर यांनी सरपंच परिषदेच्या कारकीर्दीचा आढावा घेतला. प्रदीप माने पाटील यांनी प्रास्ताविक केले. जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, जिल्हा नशामुक्त करण्यासाठी गावोगावच्या सरपंचांनी सहकार्याची भूमिका घ्यावी.
मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे म्हणाल्या, पुन्हा एकदा लोकांचा गावाकडे ओढा वाढला आहे. त्यामुळे प्रत्यक्ष लोकसंख्येच्या प्रमाणात तरंगती लोकसंख्या सांभाळणे ग्रामपंचायतींना जड जात आहे. लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सरपंचांना कसरत करावी लागत आहे. अशा काळात लोकांमध्ये विश्वास निर्माण करणे महत्त्वाचे आहे.
तासगाव पंचायत समितीचे किशोर माने, रामचंद्र मिशन, हार्टफुलनेस संस्थेच्या राज्य समन्वयक अंजली बापट, आमदार सुहास बाबर, शिवसेना सांगली जिल्हा प्रमुख आनंदराव पवार, महेंद्र चंडाळे, गौरव नायकवडी उपस्थित होते. सरपंच परिषदेचे सांगली जिल्हाध्यक्ष आण्णासाहेब कोडग, सांगली जिल्हाध्यक्षा रेखाताई पाटील, पदाधिकारी कृष्णा पाटील, पोपट पाटील, राजू गुरव, शरद पाटील, शत्रुघ्न पाटील, चंद्रकांत कदम, सदाशिव माळी, विकास डावरे यांनी मेळावा यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन जयदीप जाधव यांनी केले. नितीन भोसले, अभिजित खांडेकर, गोविंद पाटील, नागेश पाटील, विक्रांत गोरे, भूषण मगदूम यांचे सहकार्य लाभले.