सात-बारा कोरा करण्याचे महायुतीचे आश्वासन फसवे

आ. जयंत पाटील ः तिकोंडीत शेतकरी मेळावा; मूलभूत गरजा व प्रश्नांकडे सरकारचे दुर्लक्ष
Jayant Patil statememt
जत : तिकोंडी येथील शेतकरी संवाद मेळाव्यात बोलताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील व उपस्थित मान्यवर. pudhari photo
Published on
Updated on

जत : राज्यातले महायुतीचे सरकार रोज नवे मुद्दे पुढे करून स्थानिक प्रश्नांना बगल देण्याचे काम करीत आहे. निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांचा विसरही त्यांना पडला आहे. मुख्यमंत्र्यांनी शेतकर्‍यांचा सात-बारा कोरा करण्याचे ठासून सांगितले होते. पण आता अर्थमंत्री, मुख्यमंत्र्यांनी, दोन वर्षे शेतकर्‍यांना कर्ज भरावेच लागेल असे सांगून शेतकर्‍यांची फसवणूक केली आहे, असा आरोप राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी केले.

तिकोंडी (ता. जत) येथे जय हनुमान पतसंस्था आयोजित शेतकरी संवाद मेळाव्यात ते बोलत होते. या मेळाव्यास माजी आमदार विलासराव जगताप, देवराज पाटील, सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुजय शिंदे, अ‍ॅड. बाबासाहेब मुळीक, जिल्हा बँकेचे संचालक मन्सूर खतीब, राष्ट्रवादीचे नेते चन्नाप्पा होर्तीकर आदी उपस्थित होते.

आ. पाटील म्हणाले, राज्यात लोकसभेला आमच्या आघाडीचा दणदणीत विजय झाला. परंतु विधानसभेला दारुण पराभव झाला. या निवडणुका कशा पध्दतीने झाल्या, याची आपणा सर्वांनाच कल्पना आहे. आता आम्ही विरोधात असलो तरी जनतेच्या मूलभूत प्रश्नांपासून आम्ही बाजूला गेलेलो नाही.

जतच्या वंचित 65 गावांना पाणी देण्याची आणि 1961 पासून या तालुक्याशी राजारामबापूंचा असणारा ऋणानुबंध जपण्याची संधी मिळाली. आताच्या सत्ताधारी पक्षाने त्यावेळी या योजनेला पाणीच नसल्याचे सांगितले होते. परंतु आघाडीची सत्ता येताच, आपण जलसंपदा खाते मागून घेतले. उपलब्ध पाणी आणि वापरातील बदल करून जतच्या विस्तारित योजनेसाठी सहा टीएमसी, तर टेंभूसाठी आठ टीएमसी पाणी आपण दिले. त्यामुळे आता तुमच्या हक्काचे पाणी कुणीही हिरावून घेणार नाही. तसेच लाडक्या बहिणींच्या पैशाला तरी कात्री लावू नये, असे प्रतिपादन त्यांंनी केले.

जयंतराव नुसती भूल देऊ नका, सर्जरी करा : जगताप

माजी आमदार विलाराव जगताप म्हणाले, या राज्यात जाती-जातीत भांडणे लावून सत्ता उपभोगण्याचा चुकीचा प्रकार सुरू आहे. विकासाच्या नावाने काहीच नाही, पण विनाकारण डोकी भडकावण्याचा प्रकार सुरू आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात येत आहे. जयंत पाटील हे एकटेच सरकारशी दोनहात करत आहेत. या सरकारला जयंतराव तुम्ही नुसती भूल देऊ नका, त्यांची सर्जरी करा. जनतेसमोर सत्य आले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.

जनतेत संतापाची लाट ः मन्सूर खतीब

तालुकाध्यक्ष मन्सूर खतीब म्हणाले, सरकारने शेतकर्‍यांची, तरुणांची फसवणूक केली आहे. यामुळे शेतकरी, जनतेत संतापाची लाट आहे. येणार्‍या जिल्हा परिषद, पंचायत समितीला जनता भाजपला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news