

शतकानुशतके, उच्च-नीच अशा भेदात अडकलेल्या पिढ्यान् पिढ्या. महिलांचे विश्व तर घराच्या उंबर्यापर्यंतचेच. अशा जोखडात अडकलेल्या समाजाला बाराव्या शतकात क्रांतिकारी विचार देणारेच नव्हे, तर ते विचार आचरण्यासाठी बंड करणारे समाजोध्दारक म्हणजे महात्मा बसवेश्वर! दगडात नव्हे, तर माणसात देव आहे. कायक वे कैलास, म्हणजेच श्रम हाच देव असे जीवनाचे साधे सार त्यांनी अखंड विश्वाला दिले. त्यांची आज जयंती साजरी होत आहे, त्यानिमित्त...
धर्ममार्तंडांचे स्तोम माजले असताना बाराव्या शतकात माणसांना वाईट वागणूक दिली जात होती. घरात अंगा-खांद्यावर पशूंना स्थान देणार्या, पण माणसांना मात्र अस्पृश्य मानणार्या, त्यांचा स्पर्श तसेच सावलीही टाळणार्या उच्चवर्णीयांचा महात्मा बसवेश्वर यांनी निषेध केला. लहान वयातच त्यांनी या कर्मकांडाला छेद देण्याचा निर्णय घेतला. बहिणीला मुंज नाकारल्याने त्यांनीही मुंज टाळली. शिक्षण आणि बुद्धिमत्तेच्या बळावर ते बिज्जल राजाच्या दरबारात महामंत्री झाले होते. त्यांनी विवेकबुद्धीने दीन-दलित, कष्टकरी, स्त्री-पुरुष यांच्या हितासाठी, प्रेमळपणे राज्य केले. जाती व्यवस्थेविरुद्धचा झेंडा खांद्यावर घेऊन जाती निर्मूलनाची चळवळ जोमात चालवली होती. जातीवर्ण व्यवस्था त्यांनी अमान्य केली. खाद्यपदार्थ जाळणारी आणि पशूंचा बळी घेणारी यज्ञसंस्था त्यांनी धुडकावून लावली. कर्मकांड, विटाळ, अस्पृश्यता हा अधर्म मानला.
त्यांनी आत्मलिंग म्हणजे आत्मा हाच परमेश्वर, हे जनतेला पटवून दिले. घरात देव्हार्यात देव-देवतांची गर्दी करण्यापेक्षा, एक देवता हे तत्त्व मानून इष्टलिंगाची पूजा करावी, असा उपदेश ते करीत होते. इष्टलिंगाला त्यांनी सौभाग्यचिन्हच मानले होते. जन्म देणार्या आईला भेटण्यासाठी कोणत्याही मध्यस्थाची जशी गरज नसते, त्याप्रमाणे परमेश्वराकडे जाताना कोणा मध्यस्थाची किंवा पुरोहिताची गरज नसते, असे त्यांचे मत होते. ज्या धर्माने जन्मदात्या आईला, बहिणीला व समाजातील स्त्रियांना संस्कारांपासून वंचित ठेवले, त्या धर्मातील धर्मपंडितांचा त्यांनी धिक्कार केला. जी स्त्री अबला होती, तिला त्यांनी सबला केले. विधवांना पुन्हा विवाह करण्यास प्रोत्साहन दिले. वेश्यांचे पुनर्वसन केले.
वीरशैव धर्मात त्यांनी अनेक जाती-जमातींचा, व्यावसायिकांचा समावेश केलेला होता. सदाचाराला त्यांनी स्वर्ग मानले, तर अन्यायाला नरक मानले. समाजातील स्त्रिया आणि दलित या वर्गांना साक्षर करून त्यांना विचारस्वातंत्र्य दिले. हे सर्व त्यांनी कन्नड या मातृभाषेतून केले. त्यासाठी त्यांनी वचने रचली, कायक सिद्धांताने व्यवसायाची प्रतिष्ठा वाढविली. आपल्या अर्थार्जनातून दुर्बल, अपंग, निराधार लोकांना मदत करावी, असे आवाहन त्यांनी केले. त्यांच्या शरण शरणी परिवारात बाराबलुतेदार व दलित वर्गाचे लोक होते. ते स्वत: दलितांच्या वाड्या-वस्त्यांवर जात. त्यांचे भोजन स्वीकारत, त्यांच्याशी मने जुळवीत. बाराव्या शतकात स्त्री शिक्षणाचा विचारही करणे अशक्य असताना, त्यांनी स्त्रियांना अनुभवमंटपात विचार मांडण्यासाठी संधी दिली. त्यांनी स्थापन केलेली अनुभवमंटप ही लोकशाहीप्रधान विचारसंसदच होती.