

चरण : नुकत्याच पडलेल्या पावसामुळे शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागातील गुढे–पाचगणी पठार सध्या पर्यटकांचे प्रमुख आकर्षण ठरत आहे. पावसाळ्यानंतर खुलून आलेल्या निसर्गसौंदर्यामुळे येथील खोल दऱ्या, मिनी धबधबे, दाट धुके, घाटरस्त्यांची वळणे आणि चहुबाजूंनी पसरलेली हिरवाई पर्यटकांना अक्षरशः भुरळ घालत आहे. परिणामी, दररोज हजारो पर्यटक पठारावर भेट देऊन निसर्गसौंदर्याचा मनमुराद आनंद लुटत आहेत.
कराड–रत्नागिरी मार्गावरील मेणी फाट्यावरून गुढे–पाचगणी पठाराकडे जाणारा रस्ता असून, याच मार्गाने पाचगणी – गुढे – येसलेवाडी – आरळा मार्गे चांदोली धरण परिसरातही जाता येते. शिरसटवाडी येथील सेल्फी पॉइंटवर विशेष गर्दी होत असून, निसर्गरम्य पार्श्वभूमीत छायाचित्रे आणि सेल्फी टिपण्याचा मोह पर्यटकांना आवरत नाही. आमदार सत्यजित देशमुख यांच्या पुढाकारातून सुमारे ५० लाख रुपयांच्या खर्चातून दुसरा सेल्फी पॉईंट उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.