

सांगली : द्राक्षांच्या एप्रिल खरड छाटणीनंतर काडी तयार होत असते. मात्र यंदा मे महिन्यात अनेक दिवस पाऊस, ढगाळ वातावरण होते. त्यामुळे द्राक्षाची काडी तयार कशी होणार? याची चिंता द्राक्ष बागायतदारांना लागली आहे. काडी पक्व होऊन गर्भधारणा न झाल्यास घडनिर्मितीवर परिणाम होणार आहे. त्यामुळे गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही राज्यातील द्राक्ष बागायतदार संकटात येण्याची शक्यता आहे.
यंदा उन्हाळ्यातून मे महिना गायब झाल्याचे चित्र होते. ढगाळ वातावरण व सातत्याने पडणारा पाऊस, यामुळे द्राक्ष बागायतदार चिंतेत आहेत. आगाप छाटलेल्या द्राक्षबागांत महिन्यात, तर मागास छाटलेल्या बागांमध्ये अवघ्या 15 दिवसांत पाऊसाचे पाणी साचले, ढगाळ वातावरण सुरू झाले आहे.
एप्रिल छाटणीनंतर 45 ते 75 दिवस सूक्ष्मघड निर्मितीसाठी महत्त्वाचे असतात. याच कालावधीत वातावरणातील बदल शेतकर्यांसाठी घातक ठरण्याचा धोका आहे. कारण द्राक्षकाडी तयार व पक्व होण्यासाठी भरपूर सूर्यप्रकाश व उष्णतेची गरज असते. मान्सून साधारणतः जूनच्या दुसर्या आठवड्यापासून सुरू होत असतो. तोपर्यंत सांगली जिल्ह्यासह राज्यातील द्राक्षपट्ट्यात उन्हाळा चांगलाच तीव्र असतो. काडी चांगली तयार झाल्यानंतर ऑगस्ट-सप्टेंबरच्या पीक छाटणीनंतर द्राक्षघड काडीमधून बाहेर पडतात.
द्राक्षबागांसाठी 25 ते 35 अंशापर्यंत तापमान, तयार होत असलेल्या डोळ्यांवर किमान दोन ते अडीच तास सूर्यप्रकाश, 152 ते 155 सेंटिमीटरपर्यंत पानांचा आकार, वेलीतील फॉस्फरस, बोरॉन, झिंक, मॅग्नेशियम या चार अन्नद्रव्यांची पुरेशी उपलब्धता, तसेच पाणी नियोजन महत्त्वाचे असते. यंदा मे महिन्यात सातत्याने पाऊस व ढगाळ वातावरण असल्यामुळे काडी कशी तयार होणार?, असा प्रश्न बागायतदारांसमोर आहे. गेल्यावर्षीही सातत्याने पाऊस सुरू होता. त्यामुळे द्राक्ष बागायतदारांना मोठा फटका बसला. अनेकांच्या बागा वाया गेल्या. उत्पादनात घट झाली. किमान यावर्षी तरी चांगले उत्पादन येईल, अशी आशा शेतकर्यांना होती.
त्याप्रमाणे एप्रिलमध्ये मशागत करून द्राक्षबागांना शेणखत व रासायनिक खत देण्यात आले. मात्र मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच सातत्याने पाऊस सुरू आहे. अनेक शेतांमध्ये पाणी साचून आहे. त्याचा परिणाम काडी तयार होण्यावर होणार आहे. काडी तयार न झाल्यास द्राक्षघडाची निर्मिती होणे अशक्य आहे. त्यामुळे यंदाही उत्पादन घटून फटका बसणार, याची चिंता शेतकर्यांना आहे.