Tantamukti Yojana : महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजना बंद होणार?

प्रसिद्धीसाठी असलेली पुरस्कार समिती रद्द; गृह विभागाचा आदेश
Tantamukti Yojana
महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजना बंद होणार?
Published on
Updated on

दिलीप जाधव

कवठेमहांकाळ : गावातील तंटे गावातच मिटावेत, पोलिस ठाणी आणि न्यायालयांवरील ताण कमी व्हावा, सामाजिक सलोखा वाढावा या उद्देशाने तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी सुरू केलेली महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम आता गुंडाळण्याच्या तयारीत राज्य सरकार असल्याची जोरदार चर्चा आहे. गृह विभागाने 19 मे रोजीच्या शासन निर्णयामध्ये या मोहिमेला प्रसिद्धी देणाऱ्यांसाठी असलेली पुरस्कार निवड करणारी जिल्हा समिती रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यातून या चर्चेला बळ मिळत आहे.

महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेच्या अंमलबजावणीसाठी आणि मोहिमेला वस्तुनिष्ठ प्रसिद्धी मिळावी यासाठी 11 एप्रिल 2008 रोजी शासनाने जिल्हा, विभागीय व राज्यस्तरीय समित्या स्थापन केल्या होत्या. या समित्यांच्या माध्यमातून मोहिमेवर पूरक आणि प्रबोधनात्मक बातम्या देणाऱ्यांना पुरस्कार दिले जात होते. मात्र आता ही समिती कालबाह्य ठरवत शासनाने ती रद्दच करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार एप्रिल 2025 मध्ये महसूल परिषदेनंतर स्थापन करण्यात आलेल्या अभ्यास समितीने पुरस्कार समिती रद्द करण्याची शिफारस केली आहे. दरम्यान, यामुळे राज्य सरकार टप्प्या-टप्प्याने तंटामुक्त गाव मोहीम गुंडाळण्याच्या तयारीत असल्याचा आरोप केला जात आहे. याचवेळी शासनाने केवळ पुरस्कार समिती रद्द केल्याचे स्पष्ट केले असले तरी, प्रत्यक्षात हा तंटामुक्त गाव मोहिमेचे अस्तित्वच संपविण्याचा प्रारंभ असल्याची चर्चा प्रशासनात रंगली आहे. आर. आर. आबांची तंटामुक्त संकल्पना आता इतिहासजमा होणार का ? असा सवाल होत आहे.

ग्रामीण भागात तीव्र नाराजी

आर. आर. पाटील यांनी ग्रामीण भागातील किरकोळ वाद, कौटुंबिक तंटे, शेतजमिनीचे प्रश्न आणि सामाजिक संघर्ष गावपातळीवरच मिटावेत यासाठी मोहीम सुरू केली होती. अनेक गावांनी मोहिमेतून सलोखा निर्माण करत आदर्श निर्माण केला होता. आता या मोहिमेशी संबंधित समित्या रद्द करण्याचा निर्णय झाला आहे, भविष्यात योजनाच बंद करतील, या शक्यतेने ग्रामीण भागातून नाराजी व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news