

मिरज : महाराष्ट्राची दोन टोके जोडणारी आणि तब्बल 54 वर्षांपासून सेवेत असणारी महाराष्ट्र एक्स्प्रेस आजपासून सुसज्ज अशा एलएचबी कोचवर धावणार आहे. कोल्हापूर-गोंदिया एक्स्प्रेस 1 जूनपासून, तर गोंदिया - कोल्हापूर एक्स्प्रेस 3 जूनपासून एलएचबी कोचवर धावणार आहे.
महाराष्ट्र एक्स्प्रेस 1971 मध्ये सुरू झाली. वेळोवेळी तिचा कायापालट झाला. सध्या ती आयसीएफ कोचवर धावते. कोल्हापूर ते गोंदिया अशी महाराष्ट्राची दोन टोके या एक्स्प्रेसने जोडली जातात. महाराष्ट्र एक्स्प्रेस कोल्हापूर येथून दररोज दुपारी पावणेतीन वाजता सुटते. मिरजमध्ये ती 3 वाजून 50 मिनिटांनी येते, तर दुसर्या दिवशी ती गोंदियामध्ये पोहोचते. बारा जिल्ह्यांतून ती धावते. तिला तब्बल 62 स्थानकांवर थांबा आहे. त्यामुळे या गाडीला प्रवाशांची संख्या देखील जास्त असते.
रेल्वेकडून लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये असणारे जुने आयसीएफ कोच बदलून एलएचबी कोच लावण्यात येत आहेत. त्यामुळे महाराष्ट्र एक्स्प्रेसचादेखील आता कायापालट होणार आहे. सुसज्ज एलएचबी कोचमध्ये बर्थची संख्यादेखील अधिक आहे. त्यामुळे वेटिंगवर असणार्या प्रवाशांचीदेखील सोय होणार आहे.